प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांबाबत देशभरात एक उत्सुकता असते आणि त्यांची वेगळी शान असते. देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सरकार हे पद्म पुरस्कार जाहीर करते. यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात ७ मान्यवरांना पद्मविभूषण, ९ मान्यवरांना पद्मभूषण, तर ९१ मान्यवरांना पद्मश्री अशा एकूण १०६ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये तबलावादक झाकीर हुसेन, एस. एम. कृष्णा, सपाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव (मरणोत्तर), बालकृष्ण दोषी, दिलीप महालनाबीस, श्रीनिवास वर्धन यांना पद्मविभूषण जाहीर झाला, तर पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये एस. एल. भैरप्पा, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर, वाणी जयराम, स्वामी चिन्ना जीयार, सुमन कल्याणपूर, सुधा मूर्ती, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर) आणि परशुराम खुणे यांचा समावेश आहे. तसेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये डॉ. सुकमा आचार्य, उषा बर्ले, जोधय्याबाई बॅगा, प्रेमजीत बारिया, परशुराम कोमाजी खुणे, कपिल देव प्रसाद, एस. आर. डी. प्रसाद, अजय कुमार मंडावी, प्रभाकर भानुदास मांडे, गजानन जगन्नाथ माने, अभिनेत्री रवीना रवी टंडन अशा एकूण ९१ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भिकुजी इदाते, रमेश पतंगे यांचाही त्यात समावेश आहे.
या सर्वात काही लक्षवेधी दिग्गजांचा समावेश असून आपल्या कोमल सुरांनी अनेक पिढ्यांना स्वर्गसुखाची अनुभूती देणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमन कल्याणपूर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या हजारो चाहत्यांचा अानंद गगनात मावेनासा झाला असेल, हे निश्चित. कारण सुमन कल्याणपूर यांना हा पुरस्कार देण्यात विलंब झाला, असे त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे मनोगत आहे. दर वर्षी पद्म पुरस्कारांची घोषणा झाली की, सुमनताईंचे नाव नसल्याने मन खट्टू व्हायचे. हे असे वारंवार का होते? असा प्रश्न मनाला पडत असे. पण कधी कधी काही प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात आणि शोधली तरी ती सापडतील आणि आपले समाधान होईल, याची शाश्वती नसते. चला, पण ‘देर आए दुरुस्त आये…’ या म्हणीप्रमाणे यंदा त्यांच्या नावाची घोषणा करून केंद्र सरकारच्या समितीने त्यांच्याबाबत झालेला अन्याय एक प्रकारे दूर केला आहे, असेच म्हणायला हवे.
सुमन कल्याणपूर यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात १९५४ पासून तीन दशकांहून अधिकचा काळ आपल्या गोड, नितळ, पवित्र गळ्याने व मधुर शैलीने गाजवला आहे, हे निश्चित. सुमन कल्याणपूर यांनी केवळ एक-दोन नव्हे, तर १३ भारतीय भाषांमध्ये मिळून ३५०० हून अधिक गीते गायली आहेत. अशी विविधांगी गीते गाताना, त्यांनी आपली स्वत:ची शैली, आवाजातील तरलपणा, त्यातील कोमलभाव जपला आणि सतत कायम टिकवून ठेवला हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘बुझा दिये हैं खुद अपने हाथों’, ‘ठहरिये होश में आ लूँ’, ‘मेरे संग गा गुनगुना’, ‘न तुम हमे जानो’, ‘मेरे मेहबूब न जा’, ‘दिल एक मंदिर है’, ‘आयी वो बहारें’, ‘शराबी शराबी ये सावन का मौसम’, ‘ना ना करते प्यार तुम्हीं से’, ‘आज कल तेरे मेरे प्यारके चर्चे’, ‘मेरा प्यार भी तू है’, ‘जूही की कली मेरी लाडली’, अशा अनेक गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे.
तर तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. ‘वाह उस्ताद’ हे शब्द कानी पडताच प्रत्येक संगीतप्रेमींच्या डोळ्यांसमोर एकाच व्यक्तीचा चेहरा येतो ते म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन! तबल्यावर त्यांचे हात अशा प्रकारे चालतात की, कानांना जणू स्वर्गीय सुख प्राप्त होते. लोक अक्षरश: मंत्रमुग्ध होतात. पश्चिम बंगालच्या डॉ. दिलीप महालानबीस यांना ओआरएसच्या शोधाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी सुधा मूर्ती यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला असून सुधा मूर्ती सध्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत असून त्यांची प्रामुख्याने सामाजिक, परोपकारी कार्यासाठी ओळख आहे. त्यांनी कन्नड, मराठी व इंग्रजी भाषांमध्येही उत्कृष्ट पुस्तके लिहिली आहेत. सुधा मूर्ती यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सुधा मूर्ती औद्योगिक जगतात आदरणीय आहेत. पत्नी सुधा यांनी दिलेल्या १० हजार रुपयांच्या मदतीच्या जोरावर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची स्थापना केली. कोट्यवधींच्या संपत्तीच्या मालकीण असूनही सुधा मूर्ती या साधेपणाने राहतात व त्यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. दिल्ली झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राने यंदा ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. दिल्लीतील कर्तव्यपथावरील पथसंचलनास राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य मान्यवर उपस्थित असतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व राज्ये चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. या वर्षी महाराष्ट्राने चित्ररथातून ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता. या महाराष्ट्राच्या या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्तव्यपथावरील या पथसंचलनात १७ राज्ये आणि १० मंत्रालयांनी एकूण २७ चित्ररथ सादर केले. महाराष्ट्राने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला. यात राज्यातील पुरातन मंदिरे आणि महिला कर्तृत्वाचे सादरीकरण करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या या चित्ररथात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता ही तीन पूर्ण शक्तीपीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धशक्तिपीठ दाखवण्यात आले. या चित्ररथांच्या सर्वात पुढील बाजूस गोंधळी, संबळ वाद्य वाजवताना दिसतो. त्याच्या दोन्ही बाजूस आराधी, गोंधळी वाद्य वाजवताना दिसतात. त्यांच्यामागे शक्तिपीठांची मंदिरे असून त्यात देवींच्या प्रतिमा आहेत. मधल्या भागात लोककलाकार आराधी, पोतराज हे दिसतात, तर सर्वात मागे नारीशक्तीची एक मोठी स्त्री प्रतिमा दिसत आहे.