Monday, June 30, 2025

भाडे व वीज बिल न भरल्याने शिवसेना भवन सोडावे लागले

भाडे व वीज बिल न भरल्याने शिवसेना भवन सोडावे लागले

ठाकरे गटाची स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपड


नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दणका दिल्यानंतर स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपड करीत असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाला नागपूरमधील स्वत:च्या हक्काचे शिवसेना भवनसुद्धा वाचवता आले नाही. वर्षभराचे भाडे आणि वीज बिल थकवल्याने गणेशपेठ येथील कार्यालय घरमालकाने रिकामे करून घेतले. ही नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची नाचक्कीच मानली जाते.


शिवसेना कोणाची असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेने दावा केला आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली आहे.


सतीश हरडे जिल्हा प्रमुख असताना २०१४ मध्ये गणेशपेठ येथे शिवसेना भवनासाठी कार्यालय भाड्याने घेण्यात आले होते. २० हजार रुपये भाडे आणि इलेक्ट्रिक बिल सेनेला भरायचे होते. तीन ते चार वर्षे कार्यालय सुरू होते. महापालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्मचे वाटप याच कार्यालयातून झाले होते.


प्रकाश जाधव जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सात ते आठ महिने कार्यालयातून कामकाज चालत होते. त्यानंतर शिवसेनेची कार्यकारिणी बदलली आणि शिवसेना भवनातही कोणी फिरकेनासे झाले. त्यामुळे भाडे थकले. शेवटी जागा मालक किशोर राय यांनी कार्यालय रिकामे करायला लावले. ही जागा दुसऱ्याला भाड्यानेसुद्धा देण्यात आली आहे.

Comments
Add Comment