केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा
नवी दिल्ली : केंद्र सरकारने खुल्या बाजारात ३० लाख टन गहू विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती ४ ते ६ रुपयांनी कमी होऊ शकतात. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने बुधवारी आपल्या बफर स्टॉकमधून ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली आहे. हा गहू भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) मार्फत पुढील २ महिन्यांत विविध माध्यमांतून विकला जाईल. याचबरोबर, हे गव्हाचे पीठ गिरणी मालकांना ई-लिलावाद्वारे विकले जाणार आहे. तसेच, गहू दळून पीठ बनवतील आणि ते कमाल किरकोळ किमतीत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स, सहकारी संस्था आणि इतर संस्थांना २३.५० रुपये प्रति किलो दराने गहू विकणार आहे.
दरम्यान, एकदा नवीन गव्हाचे पीक बाजारात येण्यास सुरुवात झाली की, उत्पादन चांगले असल्यास, मध्य प्रदेश वगळता सर्व उत्पादक राज्यांमध्ये किंमती किमान आधारभूत किमतीच्या खाली येऊ शकतात, असे अन्य लोकांचे म्हणणे आहे. तर देशातील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी गव्हाची सरासरी किंमत ३३.४३ रुपये प्रति किलो होती, तर गेल्या वर्षी याच काळात ही किंमत २८.२४ रुपये प्रति किलो होती. त्याचवेळी, यावर्षी गव्हाच्या पिठाचा सरासरी भाव ३७.९५ रुपये प्रतिकिलो इतका नोंदवला गेला असून गेल्या वर्षी हा दर ३१.४१ रुपये प्रतिकिलो होता.