विदिशा : मध्य प्रदेशातील विदिशा येथील बंटी नगर भागात राहणारे भाजपचे माजी नगरसेवक संजीव मिश्रा यांनी गुरुवारी सायंकाळी पत्नी आणि दोन मुलांसह विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. यात चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर एक भावुक पोस्टही टाकली होती.
पोलिसांना खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात त्यांनी मुलांच्या आजारपणाचा उल्लेख करत आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
भाजपचे दुर्गानगरचे मंडल उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजीव मिश्रा यांचा पुतण्या अभिषेक याने सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी काका संजीव आणि त्यांचे कुटुंबीय बराच वेळ खोलीतून बाहेर न आल्यामुळे आम्ही त्याच्या मित्रांना आणि पोलिसांना बोलावले. पोलिस येताच खोलीचा दरवाजा तोडला असता संजीव (४५), त्याची पत्नी नीलम (४२), मुले अनमोल (१३ वर्षे) आणि सार्थक (६) हे खोलीत जमिनीवर निपचित पडलेले आढळले.
अनमोल आणि सार्थक यांचा जागीच मृत्यू झाला तर संजीव आणि त्यांची पत्नी श्वास घेत होते. दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस अधिक्षक विकास पांडे यांनी सांगितले की, खोलीतून विषाचा बॉक्स आणि एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये मुलाच्या आजारामुळे आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. याचा कोणताही इलाज नाही. मी मुलांना वाचवू शकत नाही, मला आता जगायचे नाही, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. संजीव यांचा मोठा मुलगा अनमोल गेल्या आठ वर्षांपासून मस्कुलर डिस्ट्रॉफी या दुर्धर आजाराने त्रस्त होता. काही काळापूर्वी लहान मुलालाही आजाराची लक्षणे दिसू लागली. यामुळे ते खूप चिंतीत होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
अतिरिक्त पोलीस अधिक्षक समीर यादव यांनी सांगितले की, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपासात जे तथ्य समोर येईल त्याआधारे कायदेशीर कारवाई केली जाईल.
आत्महत्येच्या काही दिवस आधी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये लिहिले होते की, देवाने शत्रूच्या मुलांनाही हा आजार देऊ नये, मस्क्युलर डिस्ट्रॉफी डीएमडी.
मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची शक्ती क्षीण होते. स्नायू कमकुवत झाल्यामुळे ते आकुंचन पावू लागतात. नंतर ते तुटायला लागतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा एक प्रकारचा अनुवांशिक आजार आहे. यामध्ये रुग्णाला सतत अशक्तपणा जाणवतो. त्याच्या मांसल स्नायूंचा विकास थांबतो.