नांदगाव प्रतिनिधी : तालुक्यात सर्वत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात असतानाच जातेगाव येथील ९वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने दुःखद निधन झाले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ (वय १५) प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडली असता तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले असता नांदगाव येथे जात असताना रस्त्यातच तिचे निधन झाले. तिच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान दुपारी तिच्या मृतदेहावर गावात शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.