Sunday, June 22, 2025

अडीच हजाराच्या लोभाने ग्रामसेवक अडकला एसीबीच्या जाळ्यात

अडीच हजाराच्या लोभाने ग्रामसेवक अडकला एसीबीच्या जाळ्यात

विकासकामांची माहिती देण्यासाठी घेतली लाच


जळगाव : धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे लेखापरीक्षणाबाबतची माहिती तक्रारदाराने माहिती अधिकारांतर्गत ग्रामसेवकाकडे मागितली होती. ही माहिती देण्याच्या मोबदल्यात अडीच हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.


अनिल नारायण गायकवाड (वय-५०) असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार ४९ वर्षीय असून ते धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील रहिवासी आहेत. त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील सन-२०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षणा बाबतची माहिती मागितली होती.


अडीच हजाराची लाच घेताना अटक...


ही सविस्तर माहिती देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम अडीच हजार रुपये एवढी ठरली होती. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पथकाने प्रजासत्ताकदिनी सापळा रचून धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे तक्रारदाराकडून अडीच हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अनिल गायकवाड यास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यांच्या पथकाने केली कारवाई...


पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरक्षिक संजोग बच्छाव, पोलीस निरिक्षक एन. एन. जाधव, बाळू मराठे, ईश्वर धनगर, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, रविंद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा