लंडन (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेकरिता आयसीसीने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्रथमच या स्पर्धेतील सर्व सामन्यांत महिला पंच असणार आहेत. आयसीसीने शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली.
१० फेब्रुवारीपासून आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धा सुरू होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने ३ सामनाधिकारी आणि १० पंच यांच्या नावाची घोषणा केली आहे.
मॅच रेफरी म्हणून जीएस लक्ष्मी (भारत), शांद्रे फ्रिट्झ (दक्षिण आफ्रिका), मिचेल परेरा (श्रीलंका) हे काम पाहतील. पंच म्हणून सू रेडफर्न (इंग्लंड), एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया), क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया), जॅकलीन विलियम्स (वेस्ट इंडिज), किम कॉटन (न्यूझीलंड), लॉरेन एजेनबाग (दक्षिण आफ्रिका), अन्ना हॅरिस (इंग्लंड), वृंदा राठी (भारत), एन जननी (भारत), निमाली परेरा (श्रीलंका) यांच्या नावांचा समावेश आहे.
आयसीसीतर्फे इतिहासात प्रथमच, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी सर्व महिला सामनाधिकाऱ्यांच्या पॅनेलची घोषणा केली आहे. क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग आणि सामने पाहण्याच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होण्याच्या आयसीसीच्या धोरणात्मक महत्त्वाकांक्षेचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे