धुळे: एटीएम कार्डची अदलाबदली करून मजुरांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळक्याला सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्यावर मुंबई आणि परिसरातून तब्बल 12 गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्याचे धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंबई पासिंग असणाऱ्या कारमध्ये एक टोळी परिसरात टेहळणी करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिकाजी पाटील तसेच संदीप पाटील, संतोष पाटील ,जयेश मोरे, इसार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा यांना दहिवद गावाकडे रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने कारवाई केली. चौकशीअंती या टोळक्याने जळगाव जिल्ह्यातील भडगाव तसेच भिवंडी, पिंपरी चिंचवड, रायगड, नवी मुंबई, ठाणे, पेल्हार या ठिकाणीही चोरी केल्याची बाब उघडकीस आली.
एटीएम वापरतांना अशी घ्या काळजी
पोलीस अधीक्षक बारकुंड यांनी नागरिकांना एटीएम कार्ड वापरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एटीएम सेंटरच्या बाहेर अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्याच्याकडून मदत न घेता बँकेचा सुरक्षा रक्षक किंवा संबंधित कर्मचारी याचीच मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.
सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत
धुळे जिल्ह्यात देखील बऱ्याच एटीएम सेंटरवर संबंधित बँकेने सुरक्षा रक्षक नेमलेले नाही. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे देखील सदोष असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संबंधित बँकांना जनतेची फसवणूक टाळण्यासाठी संबंधित कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.