राज्यातल्या बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव उघड!
- अनिकेत देशमुख
भाईंदर : मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव आता पुन्हा एकदा समोर आले आहे. संपूर्ण देशात बेरोजगारीची परिस्थिती अशी आहे की उच्चशिक्षित पदवीधर उमेदवारही शिपाई व चालक पदाच्या नोकरीसाठी अर्ज करत असल्याचे चित्र दिसत आहे. मिरा-भाईंदर, वसई विरार येथील पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी भरतीसाठी बीटेक, एमबीए, पीएचडी, एमएससी आणि एमटेक केलेल्या उमेदवारांनीही या भरतीसाठी अर्ज केले असल्याची माहिती पोलीस आयुक्तलयामार्फत देण्यात आली.
मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी ९९६ पोलीस पदांसाठी ही भरती सुरू आहे. या पदांसाठी सुमारे ७४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. वाहन चालक पदाकरता एकूण १० जागा असून पोलीस शिपाई पदासाठी ९८६ जागा आहेत.
कोरोनाच्या काळानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या असून व्यवसाय देखील बंद पडले आहेत. मोठमोठ्या पदव्या घेऊन शिक्षण पूर्ण करून देखील तरुणवर्ग बेरोजगार असल्याने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उच्चशिक्षितांनी देखील पोलीस भरतीच्या शर्यतीत भाग घेतला आहे.
मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयातील पोलीस भरती मध्ये मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यात बीटेक(१४१), एम.ई (४), बी.ई (३७१), एम.बी.ए (४५), बी.बी.ए (८१), बी.फार्म (५०), बी.कॉम (४४७३), एम कॉम (५२९), एम.एस.सी (२७९), बी.एस.सी(३९५२), एल.एल.बी (१०), एम.ए (१७३७), बी.ए (१४,८४३), बी.बी.एम (२४), बी.सी.ए(२६८), बी.एड (८), बी.एम.एस (६४), बी.पी.एड (२०), एम.पी.एड(३), बी.सी.एस (१५८), बी.एस. डब्ल्यू (३१), एम.एस.डब्ल्यू (४१) असे उच्चशिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षितांचे पोलीस भरतीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी किती उच्चशिक्षितांचे नशीब उजळणार असून भरती करता पात्र ठरणार आहेत हे भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कळणार आहे.
दरम्यान, भरती प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद, अचूक व पारदर्शक होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे वेळ आणि श्रम कमी होणार आहे. भरतीसाठी कोणीही पैशांची मागणी करत असेल तर उमेदवारांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रकाश गायकवाड, उपायुक्त, मुख्यालय, मिरा-भाईंदर, वसई विरार यांनी केले आहे.