Friday, June 20, 2025

पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील धनंजय देसाईसह २० आरोपींची निर्दोष मुक्तता

पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील धनंजय देसाईसह २० आरोपींची निर्दोष मुक्तता

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात आयटी इंजिनियर असलेल्य मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती. परंतु संपूर्ण पुण्याला हादरवून सोडणाऱ्या या हत्या प्रकरणातील सर्व २० आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.


मोहसीन शेख हत्या प्रकरणात हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाई आणि इतर २० जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. जून २०१४ साली पुण्यातील हडपसर परिसरात मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती.


जून २०१४ मध्ये सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर करण्यात आल्यामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने पीएमपीएलच्या बसगाड्या जाळल्या होता. त्यानंतर महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर केल्याच्या संशयावरून मोहसीनची आरोपींकडून हत्या करण्यात आली होती.


सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी असलेला मोहसीन पुण्यात एका आयटी कंपनीत काम करत होता. दुपारी नमाज अदा करण्यासाठी तो एका मशिदीत गेला होता. नमाज पठण केल्यानंतर मशिदीबाहेर येताच सायकलीवरून आलेल्या काही आरोपींनी अचानक त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्यामुळे मारहाणीत मोहसीनचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर मोहसीनची हत्या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहसीन शेख हत्या प्रकरणातील कायदेशीर लढाईसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. परंतु उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात अचानक काम करणे थांबवले होते. त्यानंतर आता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपींची मुक्तता करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने जाणार, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

Comments
Add Comment