भाईंदर : भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोतया पोलीस असल्याचे सांगत ४० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सुदर्शन खंदारे व जितेंद्र पटेल या दोन जणांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे.
दिपक हॉस्पिटल परिसरात श्री राज एन्क्लेव या इमारतीत साडेचारच्या सुमारास सुदर्शन खंदारे व जितेंद्र पटेल यांनी एका घरात जात पोलीस असल्याचे सांगत तुम्ही घरात वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे सांगत त्यांना घाबरवत जर तुम्हाला तुमची बदनामी सोसायटी मध्ये करून घ्यायची नसेल अथवा गुन्हा दाखल करून घ्यायचा नसेल तर आम्हाला पैसे द्या असे सांगत पैशांची मागणी केली होती. त्यानंतर पुरोहित यांना घाबरवत त्यांच्या कडून ४० हजार रुपये घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला होता.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी नवघर पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व घटना पोलिसांना सांगत रीतसर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताच नवघर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करत काही तासातच त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.
त्यांच्यावर या अगोदर गुन्हा दाखल असल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक काळे, पोलीस उप निरीक्षक लांडे, पोलीस उप निरीक्षक मालोदे व इतर कर्मचारी यांनी केली.