Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात १६ एसआरए योजना रखडणार

ठाण्यात १६ एसआरए योजना रखडणार

क्लस्टरचा फटका एसआरए योजनेला!

ठाणे (प्रतिनिधी) : क्लस्टर योजनेत सहभागी न होणाऱ्या जुन्या गृहसंकुलांवर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद हटवण्यात आली असली, तरी दुसरीकडे क्लस्टर योजनेचा मोठा फटका ठाण्यात सुरू असलेल्या एसआरए योजनांना देखील बसला आहे. संपूर्ण ठाणे शहरात आखण्यात आलेल्या क्लस्टरच्या युआरपी अर्थात (अर्बन रिन्यूअल प्लॅन) मुळे प्रक्रियेत असलेल्या तब्बल १६ एसआरए योजनांना यामुळे ब्रेक लागला आहे. या १६ प्रकल्पांमधील जवळपास एक हजारांपेक्षा अधिक पात्र झोपडपट्टीधारकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सर्व योजना युआरपीमध्ये येत असल्याने पुढील कोणतीही प्रक्रिया करण्यात येऊ नये असा अध्यादेश शासनाकडून काढण्यात आला असल्याने ही कोंडी निर्माण झाली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टरचे ४४ युआरपी नियोजित करण्यात आले आहेत. त्यातील ५ युआरपीचे नकाशे अंतिम करण्यात आले आहेत. मात्र उर्वरीत युआरपी अद्यापही अंतिम झालेले नाहीत. परंतु आता पुनर्विकासाच्या छोट्या इमारतींना देखील क्लस्टर अडसर ठरत असल्याचे दिसत आहे. ठाण्याच्या विविध भागात धोकादायक झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासात अनेक अडथळे असताना आता क्लस्टरचा देखील अडथळा ठरत आहे. एखादी सिंगल इमारत पुनर्विकासासाठी काढली, की त्यासाठी आता क्लस्टरचे ना हरकत प्रमाणपत्र आणा अशी अट घालण्यात आली आहे. परंतु हा दाखला आणण्यासाठी गेल्यानंतर तुमचा परिसर हा क्लस्टरमध्ये जात असल्याने तुम्हाला परवानगी देता येऊ शकत नसल्याचे उत्तर पालिकेच्या क्लस्टर सेलकडून दिले जात आहे. त्यामुळे शहरातील अनेक छोट्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.

दुसरीकडे १९९ झोपडपट्ट्यांपैकी ११२ झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी महापालिकेने क्लस्टर योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. यातील अनेक झोपडपट्ट्यांचा एसआरएच्या माध्यमातून सर्व्हे झालेला आहे, काहींची कामेही सुरू झाली आहेत. काहींच्या ठिकाणी नागरीकांना भाडे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर तब्बल १६ प्रकल्पांच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून हे सर्व प्रकल्प युआरपीमध्ये येत असल्याने या प्रकल्पांच्या पुढच्या प्रक्रियेलाच ब्रेक लागला आहे.

या एसआरए योजनांच्या प्रक्रियेला लागला ब्रेक…

पाचपाखाडी, बुद्ध फुलेननगर, चंदनी, कोपरी, माजिवडे, कोपरी (ठाणेकरवाडी ), पाचपाखाडी (सर्व्हे नं ४४७ पैकी ४४८), मौजे ठाणे, भीमनगर (वर्तकनगर), मौजे पाचपाखाडी (प्लॉट नं ३९२), मौजे ठाणे (मार्क्स नगर, आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक ), नौपाडा (बी केबिन), मौजे ओवळा, चरई, मौजे पाचपाखाडी (भूमापन क्रमांक १६३/३/ ब), मौजे चेंदणी (नगर भूमापन क्रमांक ९६० ते ९७९).

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -