Saturday, May 10, 2025

क्रीडा

सानिया-रोहन जोडीची अंतिम फेरीत धडक

कॅनबेरा (वृत्तसंस्था) : उपांत्य फेरीच्या सामन्यात ग्रेट ब्रीटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीचा पराभव करत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या जोडगोळीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.


उपांत्य फेरीच्या सामन्यात सानिया - रोहन जोडीने नील - देसीरा जोडगोळीचा ७-६, ६-७, १०-६ असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. भारतीय जोडीने उपांत्य सामन्यात आक्रमक सुरुवात केली. या जोडीने पहिला सेट ७-६ असा नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीने दणक्यात पुनरागमन केले. रोमांचक झालेल्या दुसऱ्या सेटमध्ये सानिया आणि रोहन यांना ६-७ च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. दुसरा सेट गमावल्यानंतर भारताच्या जोडीने जोरदार पलटवार केला. अखेरच्या सेटमध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी नील स्कूप्स्की आणि देसीरा क्रॉज्जिक या जोडीला संधी दिली नाही. भारताच्या जोडीने १०-६ च्या फरकाने तिसरा सेट एकतर्फी जिंकला. या विजयासह सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment