आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताण-तणाव, व्यसनांचे प्रमाण वाढल्यामुळे, वैवाहिक जीवनातील क्लेश, कटकटी, वादविवाद तसेच बाह्य जगातली स्पर्धा, कामाचा व्याप, सातत्याने भेडसावणारे आर्थिक प्रश्न, कर्जबाजरीपणा या सगळ्याचा परिणाम आपल्या तब्बेतीवर सातत्याने होत आहे. कोणी कितीही ठरवलं तरी त्रासदायक घटना, धाकाधकीची जीवनपद्धती आपण बदलू शकत नाही. सगळ्यांनाच यातून शांतपणे, विचारपूर्वक बाहेर पडता येईल, असं नाही. सगळेच स्वतःच्या आहार, विहार, व्यायाम खानपान याच वेळापत्रक पाळू शकतील, असेही नाही. सातत्याने अंगावर पडणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना प्रत्येकाला योग्य रुटिन सांभाळणं, तब्येतीची निगा राखण शक्य होईलच, असेही नाही. हे सगळं करीत असलो तरी आपण कायम निरोगी आणि ठणठणीतच राहू, अशी कोणतीही शाश्वती नसते. आजकाल कोणत्या वयात कोणता आजार कोणाला होईल, हे सांगता येत नाही.
आपली प्रकृती कधी गंभीर स्वरूपाचा आजार धारण करेल, कधी कोणता आजार डोकं वर काढेल, वेळेत त्याच निदान होईलच आणि त्यावर योग्य उपाय होऊन आपण पूर्ववत होऊ, अशी कोणीही खात्री देऊ शकत नाही. आजकाल संयम, समाधानी वृत्ती, साधेपणा, शांतता या आपल्या प्रकृतीला पोषक असणाऱ्या बाबींचा आपल्याला विसर पडला आहे. या सगळ्याचाच एकत्रित परिणाम म्हणजे आजकाल घरोघरी कोणत्या न कोणत्या आजाराने ग्रस्त असलेले सर्वच वयोगटातील रुग्ण आहेत. घरोघरी गोळ्या औषधांनी शिरकाव केलेला आहे. कोणाची प्रकृती प्रचंड नाजूक झाली आहे, तर कोणी कायमस्वरूपी शारीरिक, मानसिक दृष्टीने दुबळ झालेला आहे. कोणी अंथरुणाला खिळून आहे, तर कोणी आला दिवस घालवत आहे. कोणाला रोजच हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत, तर कोणाला रोज ठरावीक तपासणी करावीच लागते आहे. कोणाला रोज फिजिओथेरपी गरजेची आहे, तर कोणाला २४ तास रोज केअरटेकरची आवश्यकता आहे. कोणाला खूप पथ्यपाणी खाण्यावर मर्यादा घालण्यात आल्यात, तर कोणी सातत्याने वेगवेगळ्या डॉक्टर्सची ओपिनियन घेत फिरत आहे. कोणाची ट्रिटमेंट घरातल्या इतर सदस्यांनी हतबल होऊन, तर काही ठिकाणी मुद्दाम ठरवून अर्धवट सोडली आहे, काहींना उपचाराला पुरेसे पैसे नाहीत, तर काही ठिकाणी रुग्णाचे मनोधैर्य पूर्ण खचलं आहे.
परिस्थिती कशीही असो रुग्ण कोणीही असो अशा वेळी त्याच्या घरातील लोकांची, त्याच्या जवळपास असणाऱ्याची, त्याला सांभाळणाऱ्यांची कसोटी लागलेली असते. कोणत्याही सर्वसामान्य माणसाला त्याची कामे, रुटिन आयुष्य, आपले उद्योग व्यवसाय, घरातील इतर जबाबदाऱ्या सांभाळून एखाद्या रुग्णाची देखभाल करणे खरच त्रासदायक असते. सातत्याने ऐका माणसाला रुग्णाच्या देखभालीसाठी अडकून पडावे लागते. खूप कमी लोक अशी असतात ज्यांच्यात अंतःकरणापासून सेवाभावी वृत्ती, माया, प्रेम आणि रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद प्रत्यक्षात आणण्याची प्रबळ इच्छा असते. अनेकजण रुग्णांना भार, अडचण, डोक्याचा ताप, लचांड समजून सातत्याने त्यांना दुय्यम वागणूक देताना दिसतात. अनेक घरांत रुग्णांना पोटभर मनाजोगत जेवण मिळणेसुद्धा कठीण असते. पथ्य पाण्याच्या नावाखाली रुग्णांना अक्षरशः उपाशीपोटी ठेवले जाते. रुग्णांना सातत्याने अपमानित केले जाते, त्याला चारचौघांत मिसळू दिले जात नाही, त्यांच्यावर अनेक बंधन घातली जातात. घरातील रूममध्ये रुग्णाला कोंडून ठेवण्यापासून ते त्याला रस्त्यावर सोडून देण्याइतपत रुग्णाच्या नातेवाइकांची मजल गेलेली दिसते. समुपदेशनादरम्यान घरातील पेशंटबाबतीत अनेकांकडून अशा तक्रारी ऐकायला येतात. त्यामुळे ज्या ज्या घरात कोणत्याही वयाचे, स्वरूपाचे रुग्ण असतील, त्या घरातील सदस्यांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे, असे वाटते.
शारीरिक, मानसिक आजार हे कोणाच्याही हातात नसतात. कोणीही स्वतःहून आजारपण मागून घेत नसते. दुर्दैवाने ज्याच्यावर ही वेळ येते तो कोणत्या मनस्थिती व शारीरिक यातनांमधून जातोय याची जाणीव घरातल्याना असायला हवी. अनेक घरांमध्ये रुग्णांना वर्षानुवर्षे त्याच त्याच गोळ्या-औषधे दिली जातात. वास्तविक डॉक्टरने गोळ्या, इंजेक्शन, सलाइन हे ठरावीक कालावधीसाठी लिहून दिलेले असतात. हा पूर्ण डोस व कोर्स संपल्यावर परत डॉक्टरची भेट घेऊन, सांगितलेल्या तपासण्या करून त्यानुसार ट्रिटमेंट करणे, ठरवून दिलेल्या तारखांना डॉक्टरशी सल्लामसलत करणे, सातत्याने संबंधित डॉक्टरांच्या संपर्कात राहणे अपेक्षित असते. रुग्णाची कोणतीही औषधं आपल्या मनाने, ऐकीव माहितीनुसार बदलणे, स्वस्तातली औषधं खर्च वाचवण्यासाठी आजारी माणसाला देणे पूर्णतः चुकीचे आहे.
अनेक घरांत आजारी व्यक्तीवर घरगुती गावठी उपाय केले जातात. कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला न घेता अशा प्रकारे आजारी व्यक्तीच्या जीवाशी खेळण्याचा आपल्याला हक्क नसतो. अनेक घरांमध्ये वैद्यकीय शास्त्राला फाटा मारून आजार बरे करण्यासाठी गंडा, दोरा, ताईत, उदी, बाबा बुवा यावर वेळ मारून नेली जाते. घरगुती उपाय अथवा देवाधर्माचे उपाय, कोणाचे सल्ले ऐकून केलेले उपाय हे मूळ डॉक्टर्सची ट्रिटमेंट व्यवस्थित सुरू ठेऊन फक्त जास्तीचा फायदा मिळावा यासाठी करणे ठीक आहे. पण आपल्या सोयीनुसार रुग्णावर वेगवेगळे प्रयोग करत राहणे माणुसकीला धरून नाही.
वास्तविक ज्या ज्या कुटुंबात कोणत्याही आजाराने ग्रासलेले रुग्ण आहेत त्यांना फुकट सल्ले देणारे खूप जण असतात. प्रत्येकजण स्वतःचा अनुभव सांगून पेशंटच्या नातेवाइकांना अजून गोंधळून टाकत असतो. स्वतः काहीही मदत न करता इतरांना सल्ले देणे सोपे असते. घरातली माणसं पण काहीही करून गुण यावा, आजार बरा व्हावा यासाठी जे सांगितले जाईल, ते सर्व प्रयत्न यथाशक्ती करताना दिसतात. आजार जरी तोच असला तरी प्रत्येक रुग्णाची शारीरिक, मानसिक जडणघडण वेगवेगळी असते. त्यामुळे एकच उपचार पद्धती सगळ्यांनाच लागू होईल, असे नाही. आपल्या घरातील माणसावर इतरांचे सल्ले ऐकून उगाच वेगवेगळ्या ट्रिटमेंट करून, त्यांच्यावर सगळ्याच प्रकारच्या ट्रिटमेंटचा एकत्रित मारा करून, वेळ, पैसा, श्रम वाया घालवण्यापेक्षा, उगाच घाबरून जाण्यापेक्षा योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टर्सकडूनच सल्ला घेणे आणि तो अंमलात आणणे रास्त असते.
आजकालच्या वातावरणात निरोगी, सदृढ माणसाचा काहीही भरवसा राहिलेला नाही, कोण आपल्यातून कधी निघून जाईल, याला काहीही वेळ-काळ नाही. रुग्णांच्या बाबतीत तर ही जोखीम कित्येक पटीने वाढते. त्यामुळे आपल्या घरातील, आपल्यावर अवलंबून असलेले पेशंट यांना ज्यात आनंद मिळतोय तो त्यांना घेऊद्या. त्यांना जे करावंसं वाटतं, जे खावंसं वाटतं, जिथे जावस वाटतं ते आवर्जून करा. पेशंट अतिशय छोटया छोटया गोष्टीने खूष होतो. त्याला मनमोकळे जगू दया. त्याची लाज बाळगू नका, त्याला सगळ्यांमध्ये मान दया, सगळ्यांमध्ये मिसळून राहूद्या, त्याला हिंडवणं फिरवण सगळ्या सण सांभारंभात सामील करणं, त्याला सातत्याने त्याच्या मित्रमंडळी, नातेवाईक, आवडते व्यक्ती यांच्याशी बोलू दया, भेटू द्या. पेशंट ची तब्बेत सुधारायला औषधं उपचार जितका प्रभावी ठरत नाही इतका प्रभावी पेशंट च्या या गरजा पूर्ण करणे ठरते. पेशंट ला दम देऊन, मारून मुटकून जर त्याची बोलती बंद केली जात असेल तर हा अमानुष अत्याचार आपण करतो आहोत हे लक्षात घ्यावे. पेशंट ला एकटं सोडू नका, त्याला एकटं वाटू देऊ नका, घरातील सगळ्यांनी त्याला ही जाणीव दया कि आम्हाला तू हवा आहेस, आम्हाला तुझा त्रास होत नाही, आम्ही तुला एकदम बर करणार आहोत, तू लवकरच बरा होणार आहेस. पेशंट ला घाबरवून देण्यापेक्षा त्याच्याशी सकारात्मक बोला. आपल्याला त्रास नको म्हणून पेशंट ला उपाशी ठेवणं, जास्तीतजास्त झोपून राहील अश्या गोळया देण, त्याला एकट्याला घरात ठेऊन सगळ्यांनीच बाहेर निघून जाण ही अतिशय खालच्या दर्जाची कृत्य आहेत. अनेक घरांमध्ये पेशंट ला एक रूम अथवा ठराविक जागा दिलेली असते त्या रूम पुरताच त्याचा वावर मर्यादित असतो. घरी पाहुणे आले, काही खास कार्यक्रम असला, काही सण सोहळा असला तरी रुग्णाला त्या रूम बाहेर यायची परवानगी नसते. घरात कुठेही फ़िरणे, कुठेही बसणे उठणे, आलेल्या पाहुण्यांशी बोलणे याची सुद्धा त्याला परवानगी दिली जात नाही. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून एकत्र जेवण करणे, एकत्र चहापाणी घेणे असे छोटे छोटे आनंद पण पेशंट पासून हिरावून घेतले जातात. कोणीही असं वागत असेल तर निश्चितच ते क्रूर पणाचे आहे. पेशंट असला तरी तो एक माणूस आहे त्याला पण मन, भावना, अपेक्षा आहेत हे विसरून चालणार नाही. पेशंट ला स्वतःच्याच घरात बसण्या उठण्यावरून, खाण्यापिण्यावरून अपमानित करणं, त्याच्या सवयी वागणूक यावरून त्याला सतत टोचत राहणं म्हणजे माणुसकीला काळिमा फासणार आहे. रुग्णाला कधीही कोणाशी पण संवाद साधण्याची मुभा नक्कीच असली पाहिजे. पेशंट वर विनाकारण, स्वतःच्या सोईनुसार बंधन घालणे योग्य नाही. अनेक ठिकाणी रुग्णाला त्याच्या खोलीत, त्याच्या बेड वर जेवण दिल जात आणि घरातले इतर लोक एकत्र जेवायला बसतात. त्या जागी आपण स्वतःला ठेऊन पाहिल्यावर कळू शकतं कि हे किती दुःखद आहे. स्वतःच मन रमविण्यासाठी पेशंट ला टीव्ही, गाणी ऐकण्याची विविध साधन, मोबाईल, पुस्तकं उपलब्ध असणे गरजेचे आहे. पेशंट ला उपचारासाठी, त्याच्या दैनंदिन गरजासाठी आवश्यक ते सर्व साहित्य देखील वेळचेवेळी पुरवणे घरातल्या इतर व्यक्तींचे प्रथम कर्तव्य आहे. पेशंट ला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाण, कोणत्याही करमणुकीच्या कार्यक्रमाला नेणं देखील त्याची मानसिकता बदलायला मदत करते.
आपल्याला जर एवढेही जमणार नसेल तर उद्या दुर्देवाने आपल्यावर जर अशी वेळ आली तर आपणही कोणाकडून कोणत्या ही सकारात्मक अपेक्षा ठेवण्याचा हक्क गमावलेला असेल हे नक्की.
-मीनाक्षी जगदाळे
[email protected]