मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डावोसमध्ये केवळ चार तास झोपले, असा दावा शिंदे गटातचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीपक केसरकर म्हणाले, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील डाव्होस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी गेले होते. या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे तब्बल ७६ तास डावोसमध्ये होते. या दौऱ्यादरम्यान ते फक्त चार तास झोपले.
दिपक केसरकरांचे आरोपाला प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डावोस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देण्यासाठी दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, डावोस दौऱ्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी डावोसमध्ये जाणं गरजेचं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास डाव्होसमध्ये होते आणि यावेळी ते केवळ चार तास झोपले. ७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले”, असंही केसरकर म्हणाले.
आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद
केसरकर यांनी आदित्य ठाकरेंचे आरोप फेटाळून लावत, आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचं आणि स्वत:चं हसं करून घ्यायचं, हे योग्य नाही. जगभरातील लोक डावोसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असं होत नाही. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत.