Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीराज्यात गणेश जयंती उत्साहात

राज्यात गणेश जयंती उत्साहात

मुंबई : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, अभिषेक, महापूजा, आरती, महाप्रसाद, पालखी सोहळा अशा भक्तिमय वातावरणात माघी गणेश जयंती उत्सव राज्यात सर्वत्र उत्साहात संपन्न होत आहे.

विविध गणेश मंदिरांमध्ये अभिषेक, महापूजा, महाआरती, महाप्रसादाचे वाटप अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे.

सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाविकांची पहाटेपासून रिघ लागली होती. हातात फुलांच्या माळा, आरतीचे ताट घेऊन महिला भाविक तासन्तास रांगेत उभ्या राहिलेल्या दिसत होत्या.

सिद्धिविनायकाचे दर्शन घेणा-या भाविकांची गर्दी दादर रेल्वे स्थानकापासून दिसून येत होती.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला तिरंगी ध्वजाची सजावट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त खास सजावट करण्यात येते. यंदा माघी गणेशजयंती सलग लागून आल्याने मंदिरावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगी ध्वज रंगसंगतीची सजावट केली आहे. मंदिराच्या मुकुटस्थानी केशरी रंग त्यानंतर अशोक चक्र आणि खालच्या बाजूला तिरंग्याचे तीन पट्टे व अशोकचक्र अशी आकर्षक सजावट केलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. या रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.

राज्यात सर्वत्र बुधवारी पहाटे चार वाजल्यापासूनच परिसरातील ठिकठिकाणच्या गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी करतात. भक्तिगीते आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून जाते.

दादर येथील श्री उद्यानगणेश मंदिर, अंधेरी मालापा डोंगरी येथील गणेश मंदिर, कांदिवली येथील श्री सिद्धीविनायक मंदिर आदी मंदिरांबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक मंदिराच्या वतीने मंडप, महिला-पुरुष रांगांची सोय करण्यात आली होती. अशातच हार, दुर्वा, फुले अन्य पूजेचे साहित्य विक्री करणारे स्टॉलही मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी लाडू, पेढा, खोब-याची वडी या प्रसादाचे वाटप चालू होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -