मुंबई: मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात येणार आहे. आज हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. उद्या प्रजासत्ताक दिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात येणाऱ्या चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. तर ३१ अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
देवेन भारती यांच्याविषयी जाणून घ्या अधिक…
देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत २०१४ ते २०१९ ते सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. त्यानंतर त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती झाली. त्यावेळी त्यांना दहशतवाद विरोधी पथकातही नेमण्यात आले. मग २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात आयपीएस अधिकाऱ्यांसाठी सर्वांत कमी दर्जाची असाईन्मेंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकदावरुन देवेन भारती यांना हटवण्यात आलं. १३ डिसेंबर २०२२ रोजी देवेन भारती यांच्याजागी सहआयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर ५ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.