मुंबई : कुलाब्याहुन सांताक्रूझकडे जाणाऱ्या सी ५१ क्रमांकाच्या बसला बांद्रा येथे शॉर्ट सर्किटमुळे आज दुपारी आग लागली. बस चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांनी वेळीच सावधानता दाखवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बेस्टची सी ५१ ही बस इलेक्ट्रिक हाऊस ( कुलाबा आगार ) ते सांताक्रूझ आगार दरम्यान जात होती. मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या कंत्राटदाराची ही सीएनजी बस ७८७६ (एम एच ०१ डी आर – ७१३७) आज दुपारी सव्वा एक वाजता वांद्रे (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्ग येथील सिग्नल जवळ आली असता या बसच्या गियर बॉक्स जवळ स्पार्क होऊन शॉर्टसर्किटमुळे बस गाडीने पेट घेतला. यावेळी बस वाहक व चालकाने तातडीने बस गाडीतील २० ते २५ प्रवाशांना बस मधून खाली उतरवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सदर बस मधील कोणीही जखमी झाले नाही. आगीने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळाली असल्याचे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले. आग विझवल्यानंतर मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे अधिकारी व बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सदर बसची पाहणी केली.