आज मी जो येथे उभा आहे, तो केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे…’ असे खुल्या मनाने सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कृतज्ञता करणे असो. नाही तर, ‘बाळासाहेबांमुळेच आज या पदावर विराजमान झालो…’ असे सांगत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी बाळासाहेबांना वाहिलेली आगळीवेगळी आदराजंली असू दे. काल शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी मुंबईतील विधान भवनात आयोजित केलेला हृदयसोहळा हा एक प्रकारे बाळासाहेबांच्या आठवणींना पुन्हा उजाळा आणि कार्याला सलाम देणारा ठरला. निमित्त ठरले ते विधान भवनातील बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाiचे. हे तैलचित्र चित्रकार किशोर नादवडेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले आहे. विधान भवनातील मुख्य सभागृहात लावण्यात येणाऱ्या तैलचित्राच्या औचित्याने संपन्न झालेल्या सोहळ्याला राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.
‘एक नेता, एक पक्ष आणि एक मैदान’ असा ४० वर्षांपेक्षा जास्त काळ ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानातील लाखोंची सभा गाजवणारा नेता म्हणून बाळासाहेबांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली होती. सत्तेची चावी हातात असतानाही साध्या नगरसेवक पदापासून मुख्यमंत्रीपद दारात असतानाही कधीही त्याचा त्यांनी मोह ठेवला नाही. आज मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे, याचे सारे श्रेय बाळासाहेबांना जाते. बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या धमन्यात स्वाभिमानाचा अंगार फुलवला आणि त्यातून मराठी अस्मिता जागी झाली. मुंबईसारख्या बहुरंगी, बहुढंगी शहरात मराठी माणसाला कायम बाळासाहेबांचा आधार वाटत राहिला. तेच बाळासाहेब हे पुढे हिंदुत्वाचे रक्षक म्हणून देशभर लोकप्रिय झाले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात उसळलेल्या दंगलीत उघडपणे हिंदूच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस देशात एकमेव नेत्याने केले असेल, त्यांचे नाव बाळासाहेब ठाकरे हे होते. अशा महाराष्ट्राच्या सुपुत्राचे तैलचित्र हे महाराष्ट्राचे कायदेमंडळ असलेल्या विधानसभेत लावण्यात आल्याने, भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या आमदारांना बाळासाहेबांच्या कार्याचा इतिहास डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पावसाळी अधिवेशनात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवनात लावण्याची विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हे तैलचित्र लावले जाईल अशी घोषणा नागपूर अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली होती. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भावनिक भाषण, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले काका बाळासाहेबांबद्दल सांगितलेल्या किस्स्यांमुळे सोहळ्यात जान आणली गेली.
आज भाजपमध्ये असताना केंद्रातील चौथ्या क्रमांकांच्या मंत्रीपदावर असताही नारायण राणे यांनी बाळासाहेबांप्रति व्यक्त केलेल्या भावनांमुळे उपस्थितजनही हेलावून गेले. सामान्य कुटुंबातील माझ्यासारखी व्यक्ती आज केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचली आहे, याचे सर्व श्रेय नारायण राणे यांनी बाळासाहेबांना दिले. “बाळासाहेब होते म्हणून हा अखंड महाराष्ट्र राहिला आहे, त्यांच्यामुळे मी इथे आहे. सत्तेची सर्व ताकद त्यांच्या हातात असतानाही त्यांनी साधे महापौरपद किंवा इतर पद स्वत:कडे किंवा कुटुंबाकडे ठेवले नाही, हा त्यांचा गुण अनुकरणीय आहे. त्यांनी जे काही होते ते सर्व शिवसैनिकांना दिले हा त्यांचा मनाचा मोठेपणा हेाता”, असे विधानसभा अध्यक्षांनी गौरवोद्गार काढले. “बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व महासगरासारखे होते, “बाळासाहेबांचे तैलचित्र येथे लागले. पण सत्तेसाठी येथे येण्याचा मोह त्यांना कधीच झाला नाही,” असे उपमुख्यमंत्री फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांची कारकीर्द आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. पाकिस्तान हा देश कुठल्याही पंतप्रधानांना वा राष्ट्रपतींना घाबरला नाही, ते घाबरायचे फक्त बाळासाहेबांनाच, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांच्या सर्वदूर पसरलेल्या लोकप्रियतेची महती सांगितली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करायचा म्हटला, तर शब्दभंडार कमी पडेल, एवढे विलक्षण व्यक्तिमत्त्व बाळासाहेबांचे आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तर जगाच्या पाठीवरची कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही, हा शिवसैनिकांना दिलेला मंत्र. यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन स्वत:ला झोकून देत समाजकार्यात वाहून घेतले.
बाळासाहेबांच्या विचारांत ओतप्रोत राष्ट्रभक्ती, देशभक्ती नेहमीच दिसायची. त्यामुळे त्यांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. हा गुण नेहमीच महाराष्ट्रातील नव्हे, तर देशाच्या जनतेच्या स्मरणात राहणारा आहे. विधान भवनातील सभागृहात व्यासपीठाच्या मागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या आकाराची तैलचित्रे आहेत, तर सभागृहाच्या सभोवती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, राजमाता जिजाऊ, गणेश वासुदेव मावळणकर, एस. एम. जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, झाशीची राणी, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मध्यम आकाराची तैलचित्रे आहेत. त्यात आता बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रामुळे मराठी अस्मितेचे मानबिंदू आणि हिंदुत्वाच्या विचारांचा अंगार हा भावी पिढीच्या स्मरणात राहणारा ठरेल.
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…