शिवसेनेत मोठी फूट पडून जून २०२२ च्या अखेरीस राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवल्यावर महाआघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर साडेसहा महिन्यांनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि चाळीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
मोदींची मुंबई भेट म्हणजे शिंदे-फडणवीसांनी आयोजित केलेला मेगा इव्हेंट होता. त्यांच्या स्वागतासाठी सारी मुंबापुरी सजली होती. सर्वत्र मोदींची होर्डिंग्ज, भव्य कटआऊट्स झळकत होती. मोदींच्या स्वागताच्या मुंबईत चौफेर कमानी उभ्या होत्या. आपल्या पाच तासांच्या मुक्कामात त्यांनी आपल्या भाषणाने मुंबईकरांना मंत्रमुग्ध केलेच. पण दिलेल्या विकास प्रकल्पांमुळे मुंबईकरांची मनेही जिंकली. मोदींच्या भेटीच्या दिवशी सर्वत्र ‘मोदी मोदी’ असा जयघोष सतत ऐकायला मिळत होताच. सारी मुंबई मोदीमय झाली होती. मुंबईकरांनीही, हम तुम्हारे साथ हैं, असाच उत्स्फूर्त आणि तुडुंब प्रतिसाद मोदीजींना दिला. गेली तीस वर्षे देशातील सर्वात श्रीमंत आणि संपन्न मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. १९८५ पासून शिवसेनेने मुंबई महापालिकेत आपला पाया मजबूत करायला सुरुवात केली.
१९९५ पासून शिवसेनेने मुंबईला सलग महापौर देण्याची मालिका सुरू केली. भाजपला बरोबर घेऊन शिवसेनेने मुंबईत जम बसवला. पण नंतर राज्याची सत्ता काबीज करण्यासाठी विशेषत: मुख्यमंत्रीपदाच्या लोभापायी भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर कमळ फुलवायचे, असा भाजपने चंग बांधला आहे. शिवसेनेला हटवणे आणि भाजपची सत्ता आणणे हेच भाजपचे मुंबई मिशन आहे. शिंदे- फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जसे ठाकरे सरकार हटवले तसेच आता मुंबई महापालिकेतूनही शिवसेनेला हद्दपार करण्याचे टार्गेट या जोडीपुढे आहे. शिंदे-फडणवीस जोडीला आपले संपूर्ण आशीर्वाद आहेत, हेच मोदींनी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीच्या मैदानावर झालेल्या अतिविशाल सभेत मुंबईकरांना सांगितले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पंतप्रधानांच्या शब्दांत सांगायचे, तर मुंबई ही ‘देशकी धडकन’ आहे. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवून नेले म्हणून उद्धव ठाकरे गटाने मोदींवर कितीही आगपाखड केली तरी मुंबईकरांचे मोदींवरील प्रेम किंचितही कमी झालेले नाही, हे मोदींच्या भेटीत दिसून आले.
पश्चिम उपनगरात डी. एन. नगर अंधेरी ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर या मार्गावर दोन नवे मेट्रो मार्ग सुरू झाले, यामुळे लक्षावधी मुंबईकर सुखावले आहेत. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या आता सहा लाखांवर पोहोचली आहे. महाआघाडी सरकारच्या काळात मेट्रोचे काम पूर्ण रखडले होते, मेट्रो कारशेड कुठे उभारायची, आरे गोरेगाव की कांजूरमार्ग यातच प्रतिष्ठेचा प्रश्न करून ठाकरे सरकारने वेळ काढला. कोरोनाच्या नावाखाली दोन वर्षे सरकार घरी बसून राहिले, त्याचा परिणाम मुंबईच्या विकास प्रकल्पांवर झाला. केंद्रात व राज्यात आता भाजपचे सरकार आहे. डबल इंजिन असल्यावर विकासाला कशी गती मिळते, त्याचे हे मुंबई हे ज्वलंत उदाहरण आहे. ठाकरे सरकारच्या काळात शंभर कोटींची वसुली, ठाण्याचे मनसुख हिरेन या उद्योजकाची झालेली हत्या, सुशांत सिंग आणि दिशा सॅलियनचे संशयित मृत्यू, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांचा यंत्रणांकडून केलेला छळ, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, भाजपचे अनेक मोठे नेते यांच्याविरोधात सरकारी यंत्रणा व पोलीस बळाचा केलेला वापर. असा सत्तेचा दुरुपयोग करण्यातच राज्यकर्ते गुंतलेले होते. आता शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून केवळ विकासकामांची चर्चा चालू आहे.
मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुखावह कसे होईल, यासाठी एकनाथ शिंदे विलक्षण वेगाने काम करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे नागपूर-शिर्डी समृद्धी मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले आणि आता मुंबईतील नव्या मेट्रो मार्गाचेही त्यांनीच बटण दाबले. मेट्रो, एसी लोकल्स, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ऐतिहासिक सीएसटीचे सुशोभीकरण, फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वयंनिधी योजेनेतून मदत अशा कितीतरी योजनांना गती मिळाली आहे. वंदे भारत आली, यापुढे बुलेट ट्रेनही येणार आहे. मोदी, शिंदे आणि फडणवीस या तिन्ही नेत्यांनी मुंबईच्या विकासाची कटिबद्धता प्रकट केलीच. पण मुंबईच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे ठोस आश्वासनही पंतप्रधानांनी मुंबईकरांना दिले आहे.
मुंबईत विकासाच्या नावाखाली गेली अनेक वर्षे तेच तेच रस्ते पुन्हा पुन्हा बनवले जात आहेत, डांबरीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांची वर्षानुवर्षे फसवणूक केली जात आहे, त्याच त्या फुटपाथवर दर वर्षी पेवर ब्लॉक बसवून पुन्हा रेलिंग्ज उभारली जात आहेत. पावसाळ्यांत रस्त्यांना दर वर्षी मोठमोठे खड्डे पडतात आणि ते बुजवण्यासाठी कित्येक कोटी रुपये खर्च केले जातात. काळ्या यादीतील कंत्राटदारांना कामे दिली जातात. चाळीस हजार कोटी बजेट असलेली महापालिका म्हणजे शिवसेनेचा जीव की प्राण आहे. किंबहुना या ऑक्सिजनवर अनेकांचा राजकीय प्रवास चालू आहे. महापालिकेला टक्केवारीने ग्रासले आहे. ठेकेदाराचा विळखा आहे. दलाल, एजंट, कंत्राटदारांनी वेढले आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचे व टक्केवारीचे मोठे कुरण बनले आहे. या विळख्यातून महापालिका मुक्त करण्यासाठी मुंबईवर कमळ फुलवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. पंचवीस वर्षे सत्ता भोगली पण स्वत:ची घरे भरली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता पंतप्रधानांच्या समोरच केला. मोदींच्या दौऱ्यात सर्वात खूश दिसले ते एकनाथ शिंदे. मोदीही त्यांच्यावर खूश आहेत. शिंदे व मोदी यांच्यात विचारांचे एक ट्युनिंग छान जमले आहे. शिंदेंनी केलेल्या भाषणाची व त्यांनी केलेल्या कामांची मोदी यांनी खुल्या मनाने प्रशंसा केली, हीच एकनाथ शिंदे यांना मिळालेली सर्वात मोठी पावती आहे. मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाने व त्यांच्या कर्तृत्वाने तसेच त्यांच्या अफाट लोकप्रियतेने स्वत: शिंदे भारावून गेले आहेत.
दावोस परिषदेसाठी ते गेले असताना त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी बीकेसीवर जाहीरपणे आपल्या भाषणातून सांगितला. जगातील अन्य देशांचे नेते मोदींविषयी किती आदराने व आपुलकीने बोलतात, हे त्यांनी आवर्जून सांगितले. एका देशाच्या प्रमुखाने आपण मोदींचे भक्त असल्याचे शिंदे म्हणताच, जनसमुदायातून मोदी मोदी असा जल्लोष झाला, हा सुद्धा एक विलक्षण अनुभव होता. दावोसला एका राष्ट्रप्रमुखाने शिंदेंना विचारले, तुम्ही मोदींना मानता का, त्यावर शिंदे यांनी आम्ही मोदींचेच आहोत…, असे सांगितल्याची आठवण करून दिली तेव्हा मोदींनाही हसू आवरले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नरेंद्र मोदी यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. पण मुख्यमंत्रीपद मिळविण्याच्या नादात हे नाते मातोश्रीला टिकवता आले नाही.
मुंबईत १४७ आरोग्य चाचण्या व आरोग्य सेवा देणाऱ्या बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. पण याच सेवा शिवसेनाप्रमुखांच्या नावाने ठाकरे सरकार सत्तेवर असताना मुंबईत का सुरू झाल्या नाहीत? शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत, असे जे एकनाथ शिंदे व त्यांचे पन्नास आमदार व तेरा खासदार वारंवार सांगत आहेत, त्याचे हे उदाहरण आहे. मोदींच्या भेटीच्या निमित्ताने शिंदे-फडणवीसांनी मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन केले. या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी पंतप्रधानांचे आशीर्वाद आहेत, हाच संदेश बीकेसीवरील महासभेने जनतेला दिला. शिंदे-फडणवीस जोडीची राज्यावरील पकड मजबूत होते आहे, विकास कामांना वेग आला आहे, म्हणूनच मोदींच्या मुंबई भेटीनंतर सत्तेवरून पायउतार झालेले अस्वस्थ आहेत.
-डॉ. सुकृत खांडेकर