विनेश फोगाट, साक्षी मलिक, बबिता फोगाट यांसह ऑलिम्पिक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप लावत दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाचे हत्यार उपसले. आंदोलकांमध्ये पुरुष कुस्तीपटूंचाही समावेश होता. विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पूनिया, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियान, अंतिम पंघाल, रवी दहिया, दीपक पूनिया, संगीता फोगाट, सरिता मोर, सोनम मलिक, महावीर फोगाट, कुलदीप मलिक यांच्यासह जवळपास नामवंत ३० पैलवान या आंदोलनाचा भाग होते. एक, दोन नव्हे, तर चार दिवस जंतरमंतरसारख्या आंदोलनस्थळी देशभरातील नावाजलेले कुस्तीपटू ठाण मांडून बसले होते. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल अशा जगातील नावाजलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या या कुस्तीपटूंनी उचललेल्या या पावलामुळे भारतीय कुस्ती फेडरेशनची मान शरमेने खाली गेली असल्याचे बोलले जात आहे.
जवळपास तीन-चार दिवस प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी हे आंदोलन होते. दिग्गज कुस्तीपटूंच्या लक्षवेधी सहभागामुळे आंदोलन चांगलेच तापले. अखेर कार्यतत्पर असणाऱ्या क्रीडा मंत्रालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला. क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण यांना दिलेल्या दट्ट्यामुळेच कुस्तीपटूंमधील असंतोषाचा क्रोधाग्नी थंड झाला. क्रीडा मंत्रालयाने वेळीच हस्तक्षेप केल्याने आणि योग्य निर्णय, सूचना केल्याने अखेर कुस्तीपटूंनाही आपले आंदोलन गुंडाळावे लागले. मुळात हे आंदोलन ज्यांच्यामुळे छेडले गेले, त्या बृजभूषण सिंह यांची राजकीय वक्तव्येही वादग्रस्तच आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला याच बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. तो विरोध इतका टोकाचा होता की, राज ठाकरे यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता. आता तर देशातील दिग्गज कुस्तीपटूंच्या टीका, आरोपांना त्यांना बळी पडावे लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा क्रीडा इतिहास सुवर्णमय करणाऱ्या, पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंनाच ठिय्या धरावे लागले. आपल्या विरोधात असंतोषाची लाट उसळली असतानाही बृजभूषण यांनी आंदोलनाच्या चार दिवसांनंतरही नैतिकता बाळगून पदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले नाही.
आपल्या विरोधात असंतोषाची चूड पेटत असताना आपण मात्र निमूटपणे पदालाच चिटकून आहोत, हे बृजभूषण यांना अशोभनीय आहे. आंदोलनाची धग, त्यातील आरोप आणि आंदोलकांचा दर्जा, त्यांची संख्या पाहता खरं तर पहिल्याच दिवशी बृजभूषण यांनी स्वत:हून भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाला रामराम ठोकायला हवा होता. चार दिवस आंदोलन चालायलाच नको होते. पण इतका मोठेपणा बृजभूषण यांच्या निर्णयात दिसला नाही. योग्य वेळी निर्णय घेतला असता, तर भारतीय कुस्ती महासंघाची आब इतकी गेली नसती. याचे भान बृजभूषण यांच्यासारख्या मोठ्या पदावरील व्यक्तीला असायला हवी. आपल्या विरोधात कुस्तीपटूंचा क्षोभ वाढत असल्याची चाहूल लागताच त्यांनी पाऊल उचलायला हवे होते. पण तसे केले गेले नाही. मीच सर्व काही अशा थाटात बृजभूषण यांचा वावर होता. त्यामुळेच त्यांच्यावर आज ही वेळ आली आहे. जे बृजभूषण यांनी करायला हवे होते ते त्यांनी न केल्याने, अखेर क्रीडा मंत्रालयाला हस्तक्षेप करून बृजभूषण यांचे पंख छाटावे लागले.
क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण सिंह यांना महासंघाच्या कामांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते कुस्ती संघटनेच्या कामांपासून दूर राहणार आहेत. मात्र त्यांना पदावरून हटविण्यात आलेले नाही. तपासात निर्दोष आढळल्यास ते त्यांच्या पदावर कायम राहतील, असे संयुक्तिक आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले. क्रीडा मंत्रालयाने दिलेले हे आदेश आंदोलकांनाही पटले आणि त्यांनी आंदोलनाचे हत्यार अखेर म्यान केले. आता या प्रकरणावर विशाखा समिती गठीत केली असून ती चौकशी करून या प्रकरणातील नेमके सत्य काय आहे? हे समोर आणून दूध का दूध, पानी का पानी हे होईलच. पण बृजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या गंभीर आरोपांनी कुस्ती फेडरेशनला गालबोट लागले आहे. फेडरेशनला लागलेला हा कलंक आहे. चौकशीनंतर यातील सत्य बाहेर येईलच, पण तोपर्यंत तरी फेडरेशनला लागलेला हा डाग राहील. भारतीय कुस्ती महासंघाला जगात नावाजले जाते. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून अनेक भारतीय कुस्तीपटू जगात नाव कमावत आहेत. त्यामुळेच भारतीय कुस्ती महासंघाचा जगभरात डंका आहे. मात्र बृजभूषण यांच्यासारख्या भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रमुख पदावरील व्यक्तीवरील कलंकीत आरोपांनी आपण महासंघाला मलिन करीत आहोत, याचे भान असायलाच हवे.
त्याचे नावाजलेपण जपण्याची, टिकवण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांसह खेळाडू अशा सर्वांचीच आहे. या सर्वांनीच आपली जबाबदारी चोख बजावून फेडरेशनचे मोठेपण टिकवायला हवे. कदाचित भविष्यातही अशा प्रसंगांना सामोरे जावे लागतील किंवा असे प्रकार समोर येतील. भविष्यातील असे लांच्छनास्पद आरोप टाळण्यासाठी आताच सरकारने पाऊल उचलायला हवे. तसे उचलले गेले, तरच भारतीय कुस्ती महासंघासारख्या नावाजलेल्या फेडरेशनचे मोठेपण टिकवता येईल.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…