
पुणे : मुंबईसह उत्तर कोकणात येत्या २४ तासात कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसात हवेत गारठा असेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिली. (Weather in Maharashtra)
https://twitter.com/Hosalikar_KS
सध्या महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. नागरिकांनी गरम कपडे घालण्यास सुरुवात केली असतानाच आता हवामान विभागाच्या अंदाजाने त्यांना थंडीत आणखी दोन-तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई, उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा येत्या २४ तासात अधिक कमी होईल अशी शक्यता पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तरेकडील किमान तापमान कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील दोन दिवसात राज्याच्या काही भागात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच यामुळे राज्याच्या उत्तरेकडील शहरांमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस थंडी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.