लंडन (वृत्तसंस्था) : आयसीसीने २०२२चा सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी संघ मंगळवारी जाहीर केला. या संघात भारताचा एकमेव खेळाडू ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. या संघात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
आयसीसीने पुरुषांचा ‘कसोटी टीम ऑफ द इयर’ जाहीर केला आहे. या यादीत २०२२ कॅलेंडर वर्षात उत्कृष्ट बॅट, बॉल आणि अष्टपैलू म्हणून पुनरागमन करणाऱ्या ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. या यादीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सलाही स्थान मिळाले आहे.
आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी संघावर नजर टाकली, तर त्यात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर तीन इंग्लिश क्रिकेटपटू संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. याशिवाय भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रत्येकी एका खेळाडूची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.
उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), क्रेग ब्रॅथवेट (वेस्ट इंडिज), मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया), बाबर आझम (पाकिस्तान), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), ऋषभ पंत (भारत), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया), जेम्स अँडरसन (इंग्लंड) असा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ आहे.