
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून ३० जानेवारीला होणाऱ्या तब्बल ३० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा पुढे ढकलून ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहेत. यामध्ये लॉ, अभियांत्रिकी विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथे सत्र, वाणिज्य आणि इतर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या संदर्भातील माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
राज्यात महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी सत्र तिसरे आणि चौथे, विधि अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा ३० जानेवारी रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र या सर्व परीक्षा आता ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी बदलेल्या तारखांची नोंद घ्यावी असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे.