Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमाऊलीच्या मायेत; अजानवृक्षाच्या छायेत…...

माऊलीच्या मायेत; अजानवृक्षाच्या छायेत……

राज्यात अनेक घराण्यांमध्ये वारकरी संप्रदायाच्या पाऊलखुणा दिसतात. साताऱ्याच्या पुसेसावळीतील अयाचित घराणं याचं मूर्तिमंत उदाहरण. आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर असलेले अजानवृक्ष या घराण्याच्या पुसेसावळी येथील वाड्यात आढळतात. या वृक्षांचं बन उभं राहिल्याने अयाचित वाड्याला वारकरी संप्रदायात महत्त्व आहे. या घराण्याचे अध्वर्यू डॉ. ज्ञानेश्वर अयाचित यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्याविषयी…

मूळ पुरुषांनी आरंभलेला कार्ययज्ञ त्या घराण्यातील पुढच्या पिढ्यांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणूनच बदलत्या काळाला सामोरं जाताना त्यांनी जपलेला हा परंपरेचा ठेवा संपूर्ण समाजासाठी फलदायी ठरतो. त्या परिवाराने जतन केलेले संस्कार, हस्तलिखितं, दुर्मीळ साहित्य, पुरातन वस्तू अथवा मूर्तींचा संचय या सर्व बाबी एक समृद्ध ठेवा बनून राहतात. वंशवेल विस्तारताना हा ठेवा जपण्याचं भान आणि परंपरापालनाचं व्रत समाजासाठी एक उत्कृष्ट नमुना ठरतं. काही जुने संदर्भ अभ्यासताना, गत काळाचा आढावा घेताना या खजिन्याची मोलाची मदत मिळते. या कामी मोलाची भूमिका बजावणारे डॉ. ज्ञानेश्वर एकनाथ अयाचित यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने निधन झाले. आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर असलेले अजानवृक्ष पुसेसावळी येथे अयाचित वाड्यात आढळतात. तिथे या वृक्षांचं बन उभं राहिलं आहे. या आध्यात्मिक महात्म्यामुळे अयाचित वाड्याला वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व आहे. अयाचित वाड्यातील ज्ञानेश्वर माऊलीच्या जन्माष्टमीचा सोहळा हा साताऱ्यातील वारकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. डॉ. अयाचित गेली ४० वर्षे या सोहळ्याचे आयोजन करत असत. त्यांच्या माणसं जपण्याच्या आणि स्नेहभाव निर्माण करण्याच्या हातोटीमुळे सोहळ्याच्या निमित्ताने अनेक माणसं माऊलींशी जोडली गेली. त्यांनी अत्यंत कष्टप्रद वाटचाल करत, अनेक अडचणींना सामोरे जात, ज्ञानेश्वर माऊलींच्या उपासनेचा भक्तियज्ञ प्रज्वलित ठेवला. घरातच वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे त्यांनीही आयुर्वेदाची कास धरली आणि महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालयामध्ये विशेष कार्य अधिकारी आणि संचालक, आयुर्वेद म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांनी हयातभर या परंपरेची धुरा निष्ठेने वाहिली.

अध्यात्मामध्ये अथवा समाजरचनेमध्ये व्यक्तीपासून समष्टीपर्यंतचा विचार केला जातो. समाजाला एक चौकट मिळवून देण्यासाठी काही व्यक्ती, कुटुंबे, घराणी यांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. देश अथवा राज्य पातळीवर नसली तरी पंचक्रोशीत त्या घराण्याची एक वेगळी ओळख असते. या दृष्टीने पाहता, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडगाव (जयराम स्वामी)च्या अयाचित घराण्याच्या इतिहासाकडे पाहायला हवं. आजमितीला अयाचित घराण्याचा दहा पिढ्यांचा, वंशावळ या संबंधीचा इतिहास ज्ञात आहे. डॉ. ज्ञानेश्वर अयाचित हे या पिढीतील दहावे वंशज. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आळंदीतील श्री ज्ञानेश्वर माऊलीचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजानवृक्षाची एक शाखा त्यांच्या घराच्या बाजूला रमणीय बागेच्या स्वरूपात विस्तारली आहे. चार पिढ्यांपूर्वी आळंदीहून आणलेल्या अजानवृक्षाचं हे रोप या घराण्याने निगुतीने जपलं आहे. साक्षात ज्ञानेश्वरांनी दृष्टांत देताना दाखवलेलं श्रीरूप आजही या घराण्याच्या देव्हाऱ्यात मूर्ती स्वरूपात स्थानापन्न आहे.

खंडोबाच्या उपासनेपासून विठोबाच्या उपासनेकडे वळलेला घराण्याचा भक्तिमार्ग आजही हे घराणं श्रद्धाभावनेने जोपासतं. डॉ. ज्ञानेश्वर अयाचित घराण्याच्या संपन्न वारशाबद्दल भरभरून बोलत असत. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातलं वडगाव हे पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं गाव. आजही इथे स्वामींच्या गादीची परंपरा आहे. या गावात अकराव्या शतकातील हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरासमोर मठ आहे. तिथे स्वामीपद भूषविलेल्या सर्वांच्या समाध्या आहेत. समाध्यांवर महादेवाच्या पिंडी असून त्याला देवळाचं स्वरूप आहे. त्यातील दोन संजीवन समाधी आहेत.

ऐतिहासिक काळातील काही कथांवरून या स्वामींची ख्याती समजते. अशा या सश्रद्ध गावातील अयाचित घराण्यातील मूळ पुरुषानंतर दुसर्‍या पुरुषाची पत्नी सती गेली. वडगावमध्ये सती वेणूआई म्हणून तिची पूजा केली जाते आणि दर वर्षी वटपौर्णिमेच्या निमित्ताने तिथे दोन दिवस उत्सव साजरा होतो. या पुजेमध्ये दर सोमवारी सतीच्या हाताचं भाताने लिंपण आणि पूजन केलं जातं. यामुळे मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविक लिंपलेला भात प्रसाद स्वरूपात ग्रहण करतात. सतीसमोरच घराण्याच्या मूळ पुरुषाची समाधी आहे. पुढे अयाचित कुटुंबीय वडगावपासून तीन किलोमीटर अंतरावरील पुसेसावळी या गावी रहायला आलं. लक्ष्मण नाईक अयाचित हे पाचव्या पिढीचे प्रतिनिधी. तोपर्यंत या कुटुंबाचं कुलदैवत पालीचा खंडोबा आणि यमाई माता हे होतं. याच यमाईमातेच्या मंदिराजवळच्या तळ्यात आपला पाषाण रूपातील हात असल्याचं सती वेणूआईने दृष्टांताच्या रूपात सांगितलं, असं म्हटलं जातं. नंतर त्याची स्थापना केली गेली. लक्ष्मण नाईक अयाचित यांना सरकारकडून ‘नाईक’ हा किताब मिळाला होता. एकदा लक्ष्मण अयाचित पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाला पाहताच कमालीचे भारावले. याच भारावलेपणात ते पुन्हा पुन्हा पंढरपूरला जात राहिले. तिथे त्यांना संखे नावाचे सद्गुरू भेटले. पांडुरंगापासून दूर जाऊ नकोस, असा उपदेश केला. नंतर त्यांनी पूजेतील एका पाषाणाला विठ्ठलरूपात घडवलं. विठ्ठलाची ही मूर्ती आजही अयाचित कुटुंबाच्या देवघरात आहे.

विठोबा म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणजे गोकुळाष्टमी. तेव्हा लक्ष्मण नाईक अयाचित यांनी घरात गोकुळाष्टमीचा उत्सव सुरू केला. वीणा उभा केला. ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, भजन सुरू केलं. या लक्ष्मण अयाचितांना तीन मुलं. पांडुरंग नावाच्या तिसऱ्या मुलाला हटयोगाचा नाद होता. यथावकाश काही भाविकांसवे ते आळंदीला पोहोचले. ज्ञानदेवांच्या समाधीचं दर्शन घेताच त्यांच्या वृत्ती स्थिर झाल्या. नंतर ते गावी आले. पण आळंदीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. या ओढीपोटीच ते पुन्हा पुन्हा आळंदीला जात राहिले. त्यांनी ज्ञानेश्वरी हातात घेतली. पण समाधान होईना. ज्ञानेश्वर भेटीची ओढ स्वस्थ बसू देईना. ज्याप्रमाणे दत्त म्हणजे औंदुबर त्याप्रमाणे ज्ञानेश्वर म्हणजे अजानवृक्ष. अजानवृक्ष हे ज्ञानेश्वरांचं दृष्य रूप मानून घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनी उग्र अनुष्ठानं अवलंबली. पाच दिवस, चौदा दिवस, एकवीस दिवस अशी ही अनुष्ठानं सुरू झाली. माऊलीचा अखंड नामजप होताच. यथावकाश अजानवृक्षाचं रोप देण्यास संबंधितांची संमती लाभली आणि आळंदीतील अजानवृक्ष पुसेसावळीमध्ये बहरला. त्याच वेळी अयाचितांनी ज्ञानदेवांच्या नेमक्या रूपातील

मूर्ती घडवून घेतली. आजही हा देव्हारा देवघरातील पावित्र्य खुलवतो आहे. पांडुरंग अयाचित यांनी
पुढे गोकुळाष्टमीचा उत्सव सुरू केला. भजन-पूजनादी कार्यक्रम सुरू केले. पांडुरंग अयाचित
यांनी चितारलेलं ज्ञानेश्वरीचं हस्तलिखीतही त्यांच्याकडे आहे.

-मंगेश पाठक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -