सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत ज्या शाळेत शिकले त्या शाळेची माहिती आज आपण घेणार आहोत. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडातील एक अग्रणी नेते म्हणजे लोकमान्य टिळक. १९१८ साली चंद्रपुरात लोकमान्य टिळक आले होते. त्यांचे स्थानिक बाजार मैदानात तेजस्वी असे भाषण झाले. चंद्रपूरचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते लोकाग्रणी बळवंतराव देशमुख हे टिळकांचे अनुयायी होते. ते टिळकांचे इतके निस्सीम भक्त होते की, त्यावेळी टिळकांचा रथ देशमुख यांनी स्वतः ओढला होता.टिळकांच्या विचारांनी प्रेरित होऊनच चंद्रपुरात काहीतरी ठोस कार्य त्यांना करायचं होतं. टिळकांच्या चातु:सूत्रीत राष्ट्रीय शिक्षण हा आयाम होता. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवलं, तरच समाजाचा विकास होऊ शकतो हे लक्षात आल्यावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे ठरविले व जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते ते सारेच शिक्षणातून – येणाऱ्या पिढीच्या मनावर बिंबवण्याचे राष्ट्रकार्यच या पद्धतीने करण्याचा त्यांनी संकल्प केला. त्याचंच फलित म्हणजे लोकमान्य टिळक स्मारक मंडळ ही चंद्रपूर येथील मान्यताप्राप्त प्रतिष्ठित अशी शिक्षण संस्था. अर्थात ही संस्था अस्तित्वात येण्याच्या आधी म्हणजेच १९३२ ला या संस्थेची बीज पेरली गेली ती सिटी कोचिंग क्लासेसची सुरुवात होऊन. राष्ट्रीय आणि संघ विचारी देशमुख सुरुवातीला क्लास चालवत असत. १९३५ साली सिटी कोचिंग क्लासेसचे रूपांतर न्यू मॉडेल हायस्कूल असे झाले. सुमारे दहा वर्षे विद्यादानाचे कार्य अत्यंत समर्पित भावनेने केल्यानंतर १९४५ ला लोकमान्य टिळक स्मारक मंडळाची स्थापना झाली.
शिक्षणाच्या प्रसाराचा आणि प्रचाराचा ध्यास जो या संस्थेच्या संस्थापक सदस्यांनी घेतला तो आधीची १२ वर्षे या क्षेत्रात काम करून डोळसपणे अनुभवातून घेतला होता. १९५५ दरम्यान न्यू मॉडेल हायस्कूलचे लोकमान्य टिळक विद्यालय असे नामांतरण करण्यात आले, जे आजतागायत कायम आहे. १९६५ मध्ये, सुमारे दहा वर्षांच्या काळानंतर एकूण सामाजिक परिस्थितीचा विचार करता मुलींना स्वतंत्र शिक्षण संस्था असावी असं जाणवल्यामुळे संस्थेने ‘लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाची स्थापना केली. आज हे शहरातील मुलींच्या विद्यालयापैकी अग्रगण्य विद्यालय आहे. १९७५ साली म्हणजे कन्या विद्यालयानंतर दहा वर्षांनी स्मारक मंडळाने टाकलेले मोठे पाऊल म्हणजेच लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय. आज कनिष्ठ महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. विज्ञान आणि कला शाखांत इथे विद्याध्ययन केले जाते.
१९८३ साली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे स्व. चंद्रभागाबाई मद्दीवार हायस्कूलची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने संस्थेचा वटवृक्ष विस्तारला. सगळीकडे इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला सुरू असताना व मध्यमवर्गीय पालकांचीही मानसिकता बदलत असताना संस्थेने एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा. चंद्रपूर जिल्हयांमध्ये असलेल्या मोठमोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळामधे लाखो रुपये फी असल्यामुळे त्या शाळांमध्ये मध्यमवर्गीय व गरीबांना आपल्या मुलांची अॅडमिशन घेता येत नव्हती. अशा मुलांना माफक फीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेता यावे व त्यामध्ये आपली भारतीय संस्कृती ही जपता यावी म्हणून २००१-२००२ मध्ये लोकमान्य टिळक ज्ञान मंदिर ही शाळा सुरू करण्यात आली. शाळा सुरू केली तेव्हा शाळेत २० विद्यार्थी होते. आज शाळा पूर्ण भरली आहे.
सध्या लोकमान्य टिळक स्मारक मंडळ एकूण चार विद्यालये संचालित करते. १) लोकमान्य टिळक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, २) लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, चंद्रपूर इथे पाचवी ते दहावीपर्यंत, ३) लोकमान्य टिळक ज्ञान मंदिर, चंद्रपूर इथे नर्सरी ते १०वीपर्यंत, ४) स्वर्गीय चंद्रभागाबाई मद्दीवार उच्च प्राथमिक विद्यालय, अहेरी इथे इयत्ता १ली ते ७वीपर्यंतच शिक्षण दिलं जातं. संस्थेच्या चारही विद्यालयांत ‘विद्यार्थी विकास निधीची सोय आहे. हा निधी शिक्षक आणि व्यवस्थापन मंडळाच्या वत्सल भावनेतून विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आला आहे. यातून गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य केले जाते. संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागातून यशस्वी केलेले उपक्रमही उल्लेखनीय आहेत. स्वतंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट विद्यार्थ्यांनी साकारला. तीन भव्य रंगमंचावरून हा प्रयोग संगीत, गीते व संहितेच्या आधारे परिणामकारकरीत्या सादर करण्यात आला.सार्वजनिक गणेशोत्सवाची मूहुर्तमेढ रोवली, तीच लोकमान्य टिळकांनी त्यांच्या कल्पनेतील आदर्श गणेशोत्सव मिरवणूक काढून सगळ्या नागरिकांना विद्यार्थ्यांनी चकित करत असतात. बलोपासना ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अभ्यासाइतकीच महत्त्वाची बाब आहे. टिळकांनी तर एक वर्षाचा अल्पविराम घेऊन शिक्षण थांबवून बलोपासना केली होती. शरीर कमावले म्हणजेच अभ्यासाइतकेच खेळ, अंगमेहनतीलाही महत्त्व आहे. याच विचारातून क्रीडा हुंकार या संकल्पनेअंतर्गत विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. इतकी उपक्रमशील शाळा असेल, तर मग माजी विद्यार्थ्यांनाही शाळेची आठवण वारंवार होतच असते व ते जोडले जातात. अशाच आठवणीतून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘आम्हास नित्य प्रिय हे…’ या भावनेतून गीत गायनाचा मोठा कार्यक्रम घडवून आणला होता. विज्ञान हा फक्त अभ्यासाचा विषय न ठरता दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे हीदेखील आवश्यक गोष्ट आहे. याच संकल्पनेवर आधारित ‘लक्षवेध २०११’ या भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मंडळाद्वारा संचालित तिन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी मिळून सुमारे ६५ वैज्ञानिक प्रतिकृती सादर केल्या. हे विज्ञान प्रदर्शन समस्त शहराच्या चर्चेचा विषय ठरले. विद्यार्थ्यांमधील लेखन, वक्तृत्वगुणांचा वाव मिळावा, त्यांचे वाङ्मय भान विस्तारावे या उद्देशाने बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात विद्यार्थ्याच्या स्वलिखित कविता, लेख, कथा यांचा समावेश असलेली स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. विद्यार्थी अशा सर्व उपक्रमात उत्साहात सहभागी होतात. शिक्षण, खेळ, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्र या सर्वच विषयांत विद्यार्थ्यांचा योग्य समतोल विकास व्हावा, अशा प्रयत्नात विद्यालये आहेत. याचाच परिणाम म्हणजे आजच्या घडीला देश-विदेशांत शाळेचे विद्यार्थी कीर्ती संपादन करीत आहेत.
सरसंघसंचालक माननीय डॉ. मोहनजी भागवत, गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, काँग्रेसचे माजी खासदार नरेशबाबू पुगलिया, सर्च गडचिरोलीच्या संचालिका डॉ. राणी बंग, भाजपचे खासदार हंसराज अहिर, शिक्षण संचालक गोकुळदास कामडी, भाभा अनुशक्ती अनुसंधान केंद्रात (बार्ड) वैज्ञानिक असलेले डॉ. सुधाकर आगरकर, इस्त्रो येथे वैज्ञानिक असलेले शैलेश देशमुख, तर किराणा घराण्याची गायकी समर्थपणे पुढे नेणारे अनिरुद्ध देशपांडे हे सारे लोकमान्य टिळक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आजही फक्त शिक्षण नव्हे, तर सैन्यदलात देशाचे रक्षण करण्यासाठी दाखल झालेले पीयूष ठाकरे, प्रीतम कोडापे, सूरज कोडापे, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान उच्च शिक्षण घेऊनही सर्व संपत्ती व भौतिक सुखाकडे पाठ करून भगवान गौतम बुद्धांचे विचारांचे अवलंब करून तरुणपणीच अध्यात्मिक उन्नती करणारे वैभव चांदेकर अशा अनेकांची नावांची यादी खूप मोठी आहे.
आज संस्थेच्या सर्व शाळांमध्ये एकूण ४ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उंच उडण्याची स्वप्नं डोळ्यात घेऊन येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ देण्याचे कार्य संस्थेच्या सर्वच विद्यालयातून अविरतपणे एकनिष्ठेने आणि समर्थपणे घडत आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम दर वर्षी साजरा केला जातो. या कार्यक्रमात वर्षभर शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक व इतर विविध परीक्षा स्पर्धातून प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक पारितोषिक प्रदान करून केले जाते. २३ जुलै ही लोकमान्य टिळकांची जन्मतारीख या दिवसाच्या दर वर्षी एका नामावंत विचारवंत वक्त्याला आमंत्रित करून त्यांच्या अमोल वाणीचा लाभ शहरातील अधिकाधिक नागरिकांना व्हावा यासाठी संस्था कायम आग्रही असते. आजवर या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, राज्यसभा सदस्य सुब्रह्मण्यम स्वामी, पांचजन्याचे संपादक तरुण विजयजी, ज्येष्ठ वक्ते विवेक घळसासी, माजी आ. अशोकजी मोडक अशा वक्त्यांचा विचारांचा लाभ चंद्रपूरकरांनी घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, धर्मभास्कर श्री सदगुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांसारख्या थोरमोठ्यांनी येऊन विद्यार्थ्यांशीही संवाद साधला आहे. अहेरी या भागातल्या शाळेचा विस्तार करून उच्च शिक्षणाची सोय करण्याची भविष्यातील योजना आहे.
– शिबानी जोशी