
मराठी बिग बॉस या कलर्स मराठी वाहिनीवरील शो मधून घराघरात पोहोचलेल्या किरण माने यांना अखेर तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. या रिअॅलिटी शोचे हे चौथे पर्व होते.
या आधी 'मुलगी झाली हो' या मालिकेत किरण माने यांची मुलीच्या वडिलांची भुमिका साकारली होती. या मालिकेतून बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. या मालिकेतील एक्झिटवरुन सुरु झालेला वाद शिगेला पोहोचला होता. त्यावेळी त्यांच्या सह कलाकारांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. मात्र समाजमाध्यमावर सक्रीय असलेल्या किरण मानेंना तिथेही संमिश्र पाठिंबा मिळाला होता.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच त्यांनी ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नैराश्याबद्दल खुलासा केला. ते म्हणाले, मुलही झाली हो मालिकेतूनबाहेर काढल्यानंतर मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडले. माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर अनेक चुकीचे आरोप केले. मला काम मिळणही बंद झालं होतं. माझ्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते. जीवन संपवून टाकावंस वाटत होतं. मात्र त्यानंतर किरण माने बिग बॉस मराठी या शो मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आले. उत्तम डावपेच खेळत लोकांची मने जिंकत असतानाच त्यांना बिग बॉस मराठीमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर भावुक होत किरण माने यांनी पोस्ट लिहिली.
View this post on Instagram
किरण माने पोस्टमध्ये काय बोलले?
बिग बॉसमध्ये मी मनापासून खेळण्यात गुंग होतो, तेव्हा मला कणभरही कल्पना नव्हती की बाहेर माझ्या पाठीशी इतका जबराट सपोर्ट उभा रहातोय ! बाहेर आल्यापासून रोज माझे चाहते याची जाणीव करून देतात. परवा सातारकर भगिनींच्या वतीनं मंगळवार पेठेत माझा भव्य सत्कार आयोजित केला गेला. आमदार श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आले. अक्षरश: भारावून गेलो. जवळपास ३००० महिला यावेळी उपस्थित होत्या. सगळ्या माझ्या बहिणी मला भेटण्यासाठी, ऐकण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी आतूर झाल्या होत्या. नगरसेविका लिनावहिनी गोरे आणि राजूदादा गोरेंनी हा योग घडवून आणला. बाबाराजे जेव्हा म्हणाले की, "किरण माने आता फक्त सातार्याचे राहिले नाहीत, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके झाले आहेत." तेव्हा सगळ्यांनी जो जल्लोष केला, तो अजूनही कानात घुमतोय ! कसे आभार मानू? काय बोलू? काही सुचत नाही. सगळ्या महाराष्ट्रातून आमंत्रणं येताहेत. लोक भेटायला उत्सुक आहेत.
लै लै लै भारी वाटतंय. सगळ्यांचे मनापासून आभार.