नाशिक (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाने बोगस शाळांविरोधात सुरू केलेल्या कारवाईनंतर नाशिक महापालिका क्षेत्रात कोणत्याही मंडळाची मान्यता नसलेल्या ५ शाळा या समोर आल्या असून १९ शाळांना सीबीएससी बोर्डाची मान्यताच नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान ८ दिवसांत मान्यता नसलेल्या शाळा बंद केल्या नाहीत तर अशा शाळांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी डॉ. सुनीता धनगर यांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मान्यता नसलेल्या शाळांविरोधात कारवाई कराला सुरुवात केल्यानंतर राज्यात सर्वच शिक्षण विभागाला याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार घेतलेल्या माहितीमध्ये सीबीएससीची मान्यता नसलेल्या ५ शाळा निदर्शनास आल्या आहेत. यामध्ये नाशिकरोड येथील बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल, नाशिकरोड येथील एमराल्ड हाइट्स, पंचवटीतील विबग्योर इंटरनॅशनल स्कूल, एक्सेल पब्लिक स्कूल, औरंगाबाद रोडवरील गोल्डन डेज इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचा समावेश असून महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने या शाळांना ८ दिवसात शाळा बंद करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे, नाही तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासन अिधकारी डॉ. सुनीता धनगर यांनी दिली.
तसेच शहरामध्ये १९ शाळांना सीबीएससी बोर्डाची अधिकृत मान्यताच नाही आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.