जैन धर्मगुरूंचे राज ठाकरेंना आवाहन
ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच अखंड हिंदुस्तान मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका तुम्ही बजावा, असे आवाहन जैन धर्मगुरूंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केले आहे.
ठाणे येथील टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये शनिवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांच्याशी मंदिरातील जैन धर्मगुरूंशी संवाद साधला. यावेळी काश्मीरसह पाकिस्तानही आपल्याला हवा आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्हीच आक्रमक व्हायला हवे, तुम्ही ठरवले तरच ते शक्य आहे, असे मत यावेळी जैन धर्मगुरूंनी व्यक्त केले.
या कार्यक्रमादरम्यान मंदिरात राज ठाकरे यांनी जैन धर्मगुरु श्रीमद विजय नित्यानंद सुरीषवर्जी म. सा. यांच्याशी चर्चा केली. यावेळी तुमच्यामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा दिसते, आम्हाला अखंड भारत पाहिजे, काश्मीरसह पाकिस्तानही हवा आहे. हे फक्त तुम्हीच करू शकता, बाळासाहेबांनी जशी भूमिका बजावली तशी भूमिका तुम्ही बजावा, बाळासाहेबांसारख्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असे आवाहन जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांना केले.