Sunday, August 31, 2025

महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांची चौकशी करण्याची सोमय्या यांची मागणी

महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांची चौकशी करण्याची सोमय्या यांची मागणी

मुंबई : कोरोना काळात मुंबई महापालिकेत १०० कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला आहे. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात फोर्जरी झाली आहे, असे म्हटले आहे. पण अहवालाच्या शेवटी कारवाई करायची गरज नाही, असा शेरा धामणे यांनी मारला आहे. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

पोपट काही खात नाही, पोपटाला काही ऐकायला येत नाही, पोपट पाणी पित नाही. पोपट पेरू खात नाही, असे काही अहवालात म्हटलेले नाही. तसेच पोपट मेलाय असे देखील म्हटलेले नाही. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नेमलेल्या समितीवर आरोप करताना किरीट सोमय्या यांनी पोपटाचे उदाहरण दिले.

एकाच स्टॅम्प पेपरवर २ करार ग्राह्य कसे?

किरीट सोमय्या यांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत पत्रकार परिषद घेतली. महापालिकेच्या कोरोना काळातील घोटाळ्याबाबत मी आझाद मैदान येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने चौकशी करायला सांगितली होती. सुजित पाटकर यांनी खोटी कागदपत्रे सादर केली. एकाच स्टॅम्प पेपरवर दोन करार केले. एक मुंबई आणि दुसरा पुणे महापालिकेसोबत करार केला. हे एकाच स्टॅम्प पेपरवर २ वेगवेगळ्या ठिकाणचे करार ग्राह्य कसे धरण्यात आले, असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

कंपनीची नोटरी फोर्जरी

किरीट सोमय्या म्हणाले, पालिकेने दोन सदस्यांची समिती नेमली. सहआयुक्त सुनील धामणे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २०२२ ला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. समितीच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वात केव्हा आली यावर महापालिकेने लिगल ओपिनियन मागितले. त्यावर विधी विभाग म्हणाले, या कंपनीची नोटरी फोर्जरी आहे. महाराष्ट्रात पार्टनरशीप डीड करणे कायद्याने बंधनकारक आहे. मग दोषींवर कारवाई का केली जात नाही, असाही सवाल सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणेची चौकशी का केली नाही? पालिकेने सुजीत पाटकर आणि लाइफलाइन हॉस्पिटल विरोधात तक्रार का केली नाही? असे सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत.

Comments
Add Comment