मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती
मांजरी बुद्रुक (प्रतिनिधी) : कोरोना काळात साखर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदत केल्याचे सर्वांनी पाहिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी वर्गासमोर अनेक आव्हाने असून त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. हे लक्षात घेऊन आमचे सरकार आल्यावर ३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असून सिंचन विभागाचे १८ प्रकल्प मार्गी लावले असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मांजरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली असून या योजनेचा फायदा अधिकाधिक शेतकरी वर्गाला होणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी आजवर अनेक वेळा भेट झाली, त्यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी वर्गासोबत केंद्र सरकार कायम असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विश्वजीत कदम यांच्यासह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेचे विश्वस्त, नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
मी दावोसला जाऊन आलो : एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावरून भाषणादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात उद्योग येण्यासाठी मी दावोसला जाऊन आलो. त्यामध्ये हजारो कोटींचे करार झाले आहे. त्यामुळे आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक आली आहे. त्यावर कोणी काही म्हणू दे, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
इथेनॉल, सीएनजी, हायड्रोजनचे उत्पन्न घ्यावे : शरद पवार
भारताने २०२१-२२ मध्ये सर्वाधिक ११ लक्ष टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखरेचे उत्पन्न मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्यात १९८ साखर कारखाने आतापर्यंत सुरू असून, १३८ लाख टन सारखेचे उत्पन्न होणार आहे. तसेच राज्यातील १०६ कारखान्यांनी इथेनॉलाचा पुरवठा केला आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, साखर कारखान्यांनी यापुढे इथेनॉल, सीएनजी, हायड्रोजन उत्पन्न घेतले पाहिजे. त्यामुळे आर्थिक मदत होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.