दोन्ही गटांना सोमवारी लेखी उत्तर सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
नवी दिल्ली : शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात आज शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी २३ जानेवारी रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लेखी उत्तर मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे.
आज ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे? या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
आजच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.