पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) इतिहासातील सर्वात मोठी जाहीरात शुक्रवारी (ता.२०) प्रसिद्ध करण्यात आली आहे. गट ब आणि क संवर्गातील तब्बल आठ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ जानेवारी पासून १४ फेब्रुवारी पर्यंत आहे. ३० एप्रिल २०२३ रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन एमपीएससीच्या वतीने जिल्हा केंद्रांवर करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच सरकारी विभागांत रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, एमपीएससीच्या वतीने विविध संवर्गांसाठी ही मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात सर्वाधिक पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. बुधवार (ता.२५) पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.