भायंदर : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे आज सकाळी पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात असताना काशिमीरा भागात त्यांच्या गाडीला डंपरने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात त्यांना मार लागला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
डंपर चालक इर्शाद शहजाद खानला काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून सावंत हे स्वतःच रुग्णवाहिकेने मुंबई येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
सकाळी साडेअकराच्या सुमारास घोडबंदर येथील सगनाई नाका येथे पोहचले असताना त्यांच्या गाडीला एका डंपरने पाठीमागून धडक दिली. यात सावंत यांच्या पाठीला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली.