पुणे : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पुण्यात एका महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
रमजान खलील पटेल (वय ६०, नवीन म्हाडा वसाहत, भीमनगर मुंढवा) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार रमजान पटेल हा फिर्यादीचा ओळखीचा आहे. त्याने २०१८ मध्ये पीडित फिर्यादीला फिरायला जाऊ असे सांगून तिला बाहेर नेले. यावेळी त्याने फिर्यादीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडितेने आरोपी रमजान विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पांगरी येथे तक्रार दिली होती. या प्रकरणी सोलापूर न्यायालयात खटला सुरू आहे.
दरम्यान, फिर्यादी ज्या ठिकाणी राहते त्या इमारतीत काही दिवसांपूर्वी आरोपी रमजान हा कुटूंबासह राहण्यास आला. यानंतर त्याच्यावरील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी रमजानने तिला धमकावण्यास सुरुवात केली. बुधवारी तिला रमजानने राहत्या बिल्डिंग खाली शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून पीडिता सुदैवाने बचावली.
तिने तत्काळ पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.