मुंबई : मुंबई महापालिकेवर २०-२५ वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी केवळ डिपॉझिट केले. स्वत:ची घरे भरली परंतु मुंबईकरांना स्वच्छ पाणी दिले नाही. टक्केवारीमुळे अनेक कामे केली नाही. ४ वर्षापूर्वी मुंबईच्या रस्त्यांचे परीक्षण केले. त्यावेळी रस्त्याखालची पातळीच गायबच आहे हे आढळले. ४० वर्ष रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत त्यासाठी सिमेंट कॉक्रिंटचे रस्ते बनवण्याचे काम होणार आहे. आज त्याचे भूमिपूजन होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी येथील जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केले.
महाराष्ट्राचे आणि मुंबईकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विशेष प्रेम आहे. मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. मोदींची देशातील सर्वाधिक लोकप्रियता मुंबईत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीसांनी नुकताच दावोसचा दौरा करून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पंतप्रधान मोदींसमोर तोंड भरून कौतुक केले. यावेळी त्यांनी राज्यातील डबल इंजिनचे वेगवान सरकार असल्याचे म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मुंबईत शिवसेनेतील बंडखोरी आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावर भाष्य केले. “काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने वेगाने धावू लागला,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
“आज अनेक उद्घाटनं होणार आहे, त्यात पंतप्रधान स्वनिधी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोना काळात पंतप्रधान मोदींनी टपरीवाल्यापासून हातगाडीवाल्यापर्यंत सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची निर्मिती केली. मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यात गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला,” असा आरोपही फडणवीस यांनी केला.
“असे असले तरी आमचे पुन्हा सरकार आल्यावर आम्ही मुंबईतील एक लाख हातगाडी-टपरीधारकांना स्वनिधीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. आज हा आकडा एक लाख १५ हजारपर्यंत पोहचला आहे. मोदी एकमेव पंतप्रधान असतील ज्यांनी ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले त्याचे त्यांनी उद्घाटनही केले,” असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.
“आज मेट्रोच्या ७ व २ लाईनच्या ३५ किलोमीटरचं उद्घाटन होत आहे. त्याचं भूमिपूजन मोदींनीच केलं होतं आणि आता उद्घाटनही तेच करत आहेत. ही नवी संस्कृती मोदींमुळे राज्यात आणि देशात निर्माण झाली आहे,” असेही फडणवीसांनी नमूद केले.