मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदींचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्व हा विचारांचा धागा होता आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. मेट्रो, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक लवकरच उद्धाटन होईल. रस्ते, रेल्वे, सागरी महामार्ग याचा दळणवळण आराखडा महाराष्ट्राच्या मातीतून जगासमोर ठेवतोय. इच्छाशक्ती दाखवल्यामुळे मुंबईतील अनेक प्रकल्प मार्गी लागताहेत. ४५० किमी रस्ते सिमेंट क्रॉकिंटचे होणार आहेत. दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल आणि लोकांचे जीवन सुसज्ज होईल. काही लोक खोडा घालण्याचे काम करतायेत. त्यांना ते काम करू द्या. दरवर्षी पडणारे खड्डे आणि खड्ड्यातून जाणारे बळी रोखण्याचे काम आम्ही करतोय. निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत. डांबरीकरणाच्या नावाखाली काळे-पांढरे करणाऱ्या लोकांची दुकाने यामुळे बंद होणार आहेत हे खरे दु:ख आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
त्याचसोबत त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर कामाने देऊ. जेवढी टीका कराल त्याच्या १० पटीने काम करू. ६ महिन्यात सरकारने अनेक निर्णय घेतले त्यामुळे काहींच्या पोटात मळमळ होतेय, जळजळ होतेय. छातीत धडकी भरली आहे. ६ महिन्यात इतके काम केले तर पुढील २ वर्षात किती काम होईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लगावला.
मुंबईचा विकास करायचा आहे. चेहरामोहरा बदलायचा आहे. गेले २० वर्ष झाले नाही ते ६ महिन्यात घडतेय. लोकांना बदल दिसतोय. विकासासोबत पुनर्विकासाचे प्रकल्पही मार्गी लावतोय. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय सरकारने केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘त्रिपल’ इंजिनचा फॉर्म्युला
केंद्रात, राज्यात आपले सरकार आहे. येणाऱ्या काही दिवसांत महापालिका निवडणुका येतील. तेव्हा विकासाचे डबल इंजिन त्याचे त्रिपल इंजिनात रुपांतर होईल. मुंबईच्या विकासाची गती वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
बीकेसीत झालेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. शिंदे म्हणाले की, दावोस दौऱ्यावर सौदी, जर्मनीचे लोक भेटले. त्यांनी विचारले तुम्ही मोदींसोबत आहात ना. तर आम्ही त्यांची माणसे आहोत, असे मी म्हटले. मला सांगताना आनंद होतोय. मोदींचा करिश्मा भारतात आहेच पण दावोसमध्येही मोदींच्या नावाची डंका ऐकायला मिळतेय. हा आपला गौरव आहे. १ लाख ५५ हजार कोटींचे करार झाले पण त्यामागे आशीर्वाद मोदींचे होते. त्याठिकाणचे वातावरण पाहिल्यावर आनंद होतो. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे नाव जगातील प्रमुख नेत्यांच्या तोंडी आहे. जी 20 चे अध्यक्षपद भारताला मिळाले हे आपल्यासाठी गौरवाशाली आहे. देशाची अर्थव्यवस्था एका उंचीवर नेली आहे. महाराष्ट्राला संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राचे लोक नशिबवान, ज्या हाताने भूमिपूजन झाले त्यांच्या हातूनच उद्धाटन होतेय. हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते व्हायला नको ही अनेकांची इच्छा होती. परंतु नियतीसमोर कुणाचे काही चालत नाही. मुंबईसाठी जे विकास प्रकल्प आणतोय त्यांचे मोदींच्या हस्ते उद्धाटन होतेय. गेल्यावर्षी समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले. नव्या वर्षात मुंबईतील प्रकल्प, मेट्रोचे उद्धाटन होतेय. मेट्रोच्या रुपाने मुंबईकरांचे स्वप्न साकार होतेय, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास किती झाला हे सगळ्यांना माहित आहे. ठप्प झालेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता त्यातून लोकांची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वामुळे. मी जेव्हा कधी मोदींना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून ऊर्जा मिळते. येत्या २ वर्षात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना याच मेट्रोचे भूमिपूजन मोदींनी केले होते त्याच मेट्रोचे लोकार्पण करण्यासाठी आज ते इथे आले आहेत. हा चांगला योगायोग आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.