Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीविकासातून करणार कायापालट!

विकासातून करणार कायापालट!

मुंबईकर विकासासाठी तडफडतील हे मान्य नाही

मुंबई (विशेष प्रतिनिधी): ‘मुंबईच्या, मुंबईकरांच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणीच लागला गेला पाहिजे. तोच भ्रष्टाचारात लागला… तिजोरीत बंद राहिला… आणि शहर विकासासाठी तडफडत राहिले तर ते आम्ही पाहू शकत नाही. हे आम्हाला मान्य नाही. विकासाच्या आड येणारी कोणतीही यंत्रणा, कोणतीही प्रवृत्ती आम्हाला कधीही मान्य होणार नाही. तेव्हा मुंबईकरांनी याकडे लक्ष द्यावे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकासकामांना बळ मिळेल याची खात्री करावी’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अप्रत्यक्षरीत्या फोडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबईच्या बीकेसी मैदानावर त्यांनी जवळजवळ चाळीस हजार कोटींच्या विविध योजनांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण केले. यानंतर खचाखच भरलेल्या मैदानात मोदींनी जवळजवळ अर्धा तास भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी मुंबई महापालिकेत आतापर्यंत गेल्या काही वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेवर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माजी सरकारवर त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. कोणत्याही शहराचा विकास करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. त्या राजकीय इच्छाशक्तीची, सामर्थ्याची आमच्यात कमतरता नाही. परंतु आम्ही विकासाच्या आड येण्याचे राजकारण कधी केले नाही. भारतीय जनता पार्टीची, एनडीएची जिथे सत्ता नाही, तेथेही आम्ही विकासकामांत कधी अडथळे आणले नाही. परंतु मुंबईत, महाराष्ट्रात तसे झाले नाही. मागच्या दोन वर्षांत, आम्ही कोरोनाच्या काळात गरीब, फेरीवाले, छोटे-छोटे व्यापारी यांच्यासाठी स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध करणारी प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणली. परंतु त्या योजनेची अंमलबजावणी येथे होऊ शकली नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारने लगेचच या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आणि आज एक लाखाहून जास्त फेरीवाले, छोटे व्यापारी यांच्या खात्यात प्रत्येकी दहा-दहा हजार रुपये जमाही झाले. अडसर आणणारे लोक जर बाजूला झाले नाहीत तर याचे नुकसान तेथील जनतेला सोसावे लागते. त्यामुळेच दिल्ली ते गल्ली परस्परांमध्ये ताळमेळ ठेवणारे सरकार सत्तेवर असले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. मी मुंबईकरांबरोबर खंबीरपणे उभा आहे. मुंबईकरांसोबत चालायला तयार आहे. तुम्ही दहा पावले चालाल तर मी अकरा पावले टाकीन. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रात नवनवीन योजना आकारात येत आहेत. विकासाची ही गती यापुढे कायम राहवी यासाठी येथील जनतेने आम्हाला साथ दिली पाहिजे, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्या देशाने मोठमोठी स्वप्ने पाहायला आणि ती प्रत्यक्ष उतरवायला सुरुवात केली आहे. नाहीतर यापूर्वी येथील गरिबीची चर्चा सर्वत्र होत होती. इतर देशांकडून मदत मागणे आणि कसातरी आपला उदरनिर्वाह करणे हेच आपले उद्दिष्ट होते. परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही. आज दुनियेलाही कळून चुकले आहे की भारत आपल्या सामर्थ्याचा पूर्णपणे सदुपयोग करत आहे. त्यामुळेच आज देशामध्ये तसेच परदेशांमध्येही भारताला फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१४ पर्यंत मुंबईत फक्त दहा ते अकरा किलोमीटर मेट्रोचे काम झाले होते. पण त्यानंतर डबल इंजिनचे सरकार आले आणि आता तीनशे किलोमीटर मेट्रोचे जाळे पसरविण्याच्या कामाला वेग आला आहे. आज आम्ही देशाच्या प्रत्येक मोठ्या शहरात एका छताखाली दळणवळणाच्या सर्व सुविधा, वाहतुकीच्या सर्व व्यवस्था उपलब्ध होतील अशी यंत्रणा निर्माण करत आहोत. मुंबईच नाही तर आसपासच्या जिल्ह्यांतल्या लोकांनाही मुंबईत येण्याचा प्रवास सुखकारक होईल अशी व्यवस्था उभी करत आहोत. या व्यवस्थेला समाजातला सर्व वर्ग तितक्याच उत्स्फूर्ततेने प्रतिसाद देत आहे हे सांगण्यासही पंतप्रधान मोदी विसरले नाहीत.

महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला. मात्र, डबल इंजिनच्या सरकारवर जनतेला विश्वास आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली. डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा कायापालट होणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आज मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. यापूर्वी देशात फक्त गरिबीवर चर्चा करत वेळ काढला जायचा. आता भारत आपल्या सामर्थ्याच्या बळावर योग्य वापर करत आहे. भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहे. स्वातंत्र्यानंतर भारत पहिल्यांदाच मोठी स्वप्न बघतो आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -