Tuesday, March 25, 2025
Homeमहामुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर

मेट्रोच्या २ मार्गिकांसह विविध योजनांचे करणार लोकार्पण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरूवारी संध्याकाळी मुंबईच्या दौऱ्यावर येत असून यामध्ये ते मुंबईतल्या दोन मेट्रो तसेच मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करणार आहेत. यानंतर त्यांची बीकेसी मैदानात एक जाहीर सभाही होणार आहे.

फार कमी वेळेत होणाऱ्या या भरगच्च कार्यक्रमात संपूर्ण व्यवस्था चोख असावी म्हणून डावोसहून मुंबईत परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम ठिकाणचा आढावा घेतला. सुरक्षेच्या कारणात्सव मेट्रोच्या गाड्या संध्याकाळी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. याच कारणांसाठी ड्रोन तसेच हलक्या विमानांचे उड्डाण थांबविण्यात येणार आहे. एसपीजी आणि मुंबई पोलीस एकत्रितपणे पंतप्रधानांच्या साऱ्या मार्गांची सुरक्षाव्यवस्था निश्चित करणार आहेत.

मुंबईतील मेट्रो ७ आणि मेट्रो २अचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. मेट्रो ७ दहिसर ते अंधेरी तर मेट्रो २ अ दहिसर ते डीएन नगर धावणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरांवरील वाहतुकीचा ताण हलका होईल. मेट्रो म्हणजे गारेगार प्रवास आणि वेळेची बचत. मुंबई मेट्रो ही मुंबईतील वाहतूक कोडींवर मोठा पर्याय समोर आला होता. २०१४ साली पहिली मुंबई मेट्रो मुंबईकरांना मिळाली. त्यानंतर आता या दोन मेट्रो मुंबईकरांना मिळणार आहेत. गुंदवली मेट्रो स्थानकात फलाटाचेही लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबई महापालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मैदानात गुरुवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमादरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील २० नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे (एसटीपी) भूमिपूजन, पालिकेच्या ३ रुग्णालयांच्या इमारतींचे भूमिपूजन आणि पालिकेच्या अखत्यारितील ४०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा लाभ होणार आहे. या वितरणाचा शुभारंभदेखील पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मान्यवर लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सीएसएमटी रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटणार आहे. या प्रकल्पांतर्गत सीएसएमटी आणखी भव्य आणि अत्याधुनिक सुविधांसह रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सोयीस्कर आणि दर्जेदार बनवण्यासाठी नव्या रूपात येईल, असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्प 18,000 कोटी रुपयांचा आहे.

चोख बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत असल्याने बीकेसी आणि गुंदवली मेट्रो स्थानक येथील नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच 5.30 ते 5.45 या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतुक संथ गतीने सुरू असेल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -