Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीराज ठाकरेंना परळी कोर्टात ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

राज ठाकरेंना परळी कोर्टात ५०० रुपयांचा दंड आकारुन अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

परळी (बीड) : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट परळी कोर्टाने आज रद्द केले. सन २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांना कोर्टाने अटक वॉरंट बजावले होते. राज ठाकरे आज स्वतः कोर्टात हजर झाले. यावेळी कोर्टाने पाचशे रुपयांचा दंड बजावून त्यांच्यावरील अटक वॉरंट रद्द केल्याची माहिती अ‍ॅड. अर्चित साखळकर यांनी दिली.

सन २००८ मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.

आज राज ठाकरे स्वत: परळी न्यायालयात हजर राहिले. कोरोना काळ, त्यानंतर झालेली सर्जरी, तब्येतीमुळे लांबचा प्रवास करण्यास असमर्थ ठरल्याने न्यायालयात हजर राहता आले नाही असा अर्ज ठाकरे यांच्याकडून वकिलांनी न्यायालयात दाखल करण्यात आला. यावरून कोर्टाने त्यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट रद्द केले. राज ठाकरे यांच्यासोबत मुंबईचे अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर, अ‍ॅड. अर्चित साखळकर, पुण्याचे अ‍ॅड. अरुण लंबुगोळ तर परळी येथील हरिभाऊ गुट्टे होते.

राज ठाकरे यांचे आज सकाळी गोपीनाथ गड येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते थेट परळी न्यायालयात हजर झाले. कोर्टाची प्रक्रिया संपली असून ठाकरे यांचा दुसरा कोणताही नियोजित राजकीय कार्यक्रम नाही. ते थेट मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -