त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला तर मेघालय-नागालॅंडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान, निकाल २ मार्चला
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभांच्या तारखा जाहीर केल्या. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल २ मार्च रोजी जाहीर होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली.
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. तिन्ही राज्यांमध्ये ६०-६० सदस्यांच्या विधानसभा आहेत. नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या विधानसभेची मुदत अनुक्रमे १२ मार्च, १५ मार्च आणि २२ मार्च रोजी संपत आहे. या निवडणुकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही राज्यांमध्ये बहुमताचा आकडा ३१ आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, तिन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांचा सहभाग जास्त आहे, येथे निवडणूक काळात हिंसाचाराच्या घटना आजपावेतो कमीच राहल्या. निष्पक्ष निवडणुकांसाठी आम्ही व आमची यंत्रणा या ठिकाणी कटिबद्ध आहोत.
मेघालयात २०१८ मध्ये ५९ जागांवर निवडणूक झाली. काँग्रेसला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपला येथे केवळ २ जागा मिळू शकल्या. नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीईपी) १९ जागा मिळाल्या. पीडीएफ आणि एचएसपीडीपीने मिळून सरकार स्थापन केले. त्यांनी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्सची स्थापना केली. गेल्या तीन महिन्यांपासून येथील पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने ४० आणि एनपीपीने ५८ उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे.
त्रिपुरा मध्ये २०१८ मध्ये ५९ जागांवर निवडणुका झाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. ३५ जागा मिळाल्या. डाव्यांचा २५ वर्षांचा बालेकिल्ला भाजपने उद्ध्वस्त केला होता. यापूर्वी बिप्लब देव यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते, परंतु मे २०२२ मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सीपीएम आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. ममता बॅनर्जींचा टीएमसी हा आणखी एक मोठा पक्ष आहे, जो भाजपला टक्कर देऊ शकतो.
नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) सरकार आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. एनडीपीपी २०१७ मध्ये अस्तित्वात आला. २०१८ मध्ये दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. त्यानंतर एनडीपीपीने १८ तर भाजपने १२ जागा जिंकल्या. यानंतर एनडीपीपीने एनपीपी आणि जेडीयू सोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षी दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात एनडीपीपी ४० आणि भाजप २० जागांवर एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.