मुंबई : जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. यासंदर्भात मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दावोस परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार केल्याचे सांगितले.
अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प (रोजगार १५ हजार), ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार २ हजार), इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प (रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प (रोजगार २ हजार) तसेच गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार ३० हजार) अशा काही करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळेल.
महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर-हाथवे या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून नागरी विकासाला चालना मिळणार आहे. तर पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा १ हजार ६५० कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे २ हजार रोजगार निर्मिती होईल.
मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा १६ हजार कोटींच्या गुंतवणूकीचा प्रकल्प येणार असून, यामुळे आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेंत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील. तसेच बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.