Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग

जिल्ह्यातून बुलेट ट्रेन सुसाट; भूसंपादनाचे कार्य पूर्ण

संदीप जाधव
बोईसर : पालघर-मुंबई-अहमदाबाद अती जलद रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामात पालघर जिल्ह्याने चांगलाच वेग घेतला आहे. पालघर जिल्ह्यात जवळपास १०० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८ किमीचे अंतर अवघ्या २ तासांत पार करण्याची क्षमता बुलेट ट्रेनमध्ये आहे. जिल्ह्यात बुलेट ट्रेन मार्गासाठी एकूण १९१.५४ हेक्टर खासगी जागेची गरज लागणार आहे. यापैकी आतापर्यंत १०० टक्के संपादन पूर्ण करण्यात आले असून यापैकी ६९.४१ टक्के जमिनीचा मोबदला वाटप करण्यात आला आहे, तर १८३.९९ हेक्टर बुलेट ट्रेनच्या नावे सातबारा झाला आहे.

२०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि अहमदाबाद या दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा करून २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सुरुवातीपासूनच पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि संघटनांचा या प्रकल्पास प्रखर विरोध होऊ लागल्याने बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास ब्रेक लागला होता. याकरिता भूसंपादनात अनेक अडथळे पार करत आता खऱ्या अर्थाने बुलेट ट्रेनच्या कामाने वेग घेतला असून ज्या भागातून हा मार्ग जात आहे तेथील जागेला आता सोन्याचा भाव आला आहे. पालघर जिल्ह्यातील ७१ गावामधून सदर जागा संपादित करण्यात आली आहे, तर जिल्ह्यातील या जमीनधारकांना आतापर्यंत ७३४ कोटी रुपये इतका मोबदला देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यात मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी खासगी हस्तांतरित झालेल्या जमिनी व देण्यात आलेला मोबदला व बाकी मोबदला तपशीलवार माहिती खालील देण्यात आली आहे. वसई तालुक्यात एकूण ३७.०३ हेक्टर खासगी जागेपैकी १९.८८ हेक्टर जागेचा मोबदला वाटप करण्यात आला असून १५.०९ मोबदला देणे बाकी आहे. पालघर तालुक्यात ७०.३४ हेक्टर खासगी जागा बाधित होणार असून यापैकी ४२.९८ हेक्टर जागेचा मोबदला वाटप करण्यात आला आहे २५.४२ हेक्टर जागेचा मोबदला देणे बाकी आहे.

तलासरी तालुक्यात एकूण ३३.३१ हेक्टर खासगी जागा लागणार असून त्यापैकी २८.९५ हेक्टर जागेचे मोबदला वाटप करण्यात आला आहे ४.३६ मोबदला देणे बाकी आहे. डहाणू तालुक्यात ५०.८५ हेक्टर खासगी जागा बाधित होणार असून यापैकी ४१.१४ हेक्टर जागेचा मोबदला वाटप करण्यात आला आहे, तर ९.७१ हेक्टर जागेचा मोबदला देणे बाकी आहे.

जमिनीच्या मालकांनी भूसंपादनाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून स्वतःहून सहकार्य करणाऱ्या बाधित जमीन मालकांना शासनाकडून घोषित चारपट मोबदल्याऐवजी आणखी एकपट वाढीव असा एकूण पाचपट मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांनी आपले कागदपत्रे कार्यालयात जमा करून आपला मोबदला घ्यावा. – सुरेंद्र नवले, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -