या वर्षीच्या ९ राज्यांतील विधानसभा निवडणुकांत मिळवा वर्चस्व
मोदी सरकारची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा
राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांचा ‘रोड शो’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या संदर्भात सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेबाबतच्या अजेंड्यावर चर्चा झाली. त्याशिवाय देशातील विविध मुद्द्यांवर आणि पक्षातील संघटनात्मक मुद्द्यांवरी चर्चा झाली. बैठकीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी २०२४ च्या मेगाप्लॅनबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा आणि भाजपचे राज्य असणाऱ्या राज्यातील १२ मुख्यमंत्री आणि ५ उपमुख्यमंत्री, ३५ केंद्रीय मंत्री, यांच्यासह किमान ३५० नेते सहभागी होते. त्याशिवाय अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकऱ्यांना काही सूचना केल्या. त्यात २०२३ हे वर्ष विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे तत्काळ कामाला लागा. गुजरातमध्ये ज्या प्रकारे कष्ट घेऊन १५० जागा निवडून आणल्या आहेत, त्याच प्रकारे आता या वर्षी होणाऱ्या ९ विधानसभा निवडणुकांत वर्चस्व प्राप्त करायचे आहे.
एकाही राज्यातील सत्ता जाता कामा नये. कार्यकर्त्यांनो कामाला लागा. जास्तीत जास्त बूथपर्यंत पोहोचायचे आहे. सुरुवातीला ७० हजार टार्गेट होते. मात्र आपण १ लाख ३० हजार बूथपर्यंत पोहोचलो आहोत. अजूनही कमजोर बूथ ओळखून त्याठिकाणी काम वाढवा, असे त्यांनी सांगितले. २०२४ मध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवायची आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुका गांभीर्याने घ्या, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा. गरीब कल्याण योजना, अन्न सुरक्षा योजना याबाबत माहिती द्या, असे आवाहन त्यांनी केले.
आता २०२३ मध्ये ९ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून सुरू झाली. ही बैठक मंगळवारपर्यंत म्हणजेच १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. बैठक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद मार्ग ते एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर असा सुमारे १५ मिनिटे ‘रोड शो’ केला. त्यानंतर ते कार्यकारिणीच्या बैठकीला पोहोचले.
भाजपची ही बैठक महत्त्वाची आहे कारण बैठकीनंतर अवघ्या आठवडाभरात पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष उरले असून, त्यामुळे नड्डा यांना मुदतवाढ दिली जाण्याची दाट शक्यता आहे. पक्षाध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये मे ते जून दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या, २०२२ मध्ये भाजप संघटनेच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत.
भाजपचे काम…
रवी शंकर प्रसाद म्हणाले, ‘७५ वर्षांनंतर ‘राजपथ’चे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ केले. आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी काशी कॉरिडोर, महाकाल लोक, केदारनाथचे पुनर्स्थापित केले. त्याशिवाय राम मंदिराचे कामही अखेरच्या टप्प्यात आहे. ‘ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. त्याशिवाय मोबाइल फोनची निर्मिती करणाऱ्यांमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात ‘मेक इन इंडिया’ फोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले.