
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत गोवरला नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले असले तरी साकीनाका येथे राहणाऱ्या ८ महिन्यांच्या बाळाचा सोमवारी गोवरमुळे मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून डेथ कमिटीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईत गोवरमुळे आतापर्यंत २० बालकांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी दिवसभरात ११ बाधित रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. दरम्यान, सोमवारी मृत्यू झालेल्या मुलीला ताप, सर्दी, खोकला होता. ८ महिन्यांची मुलगी असल्याने ती रुबेला लसीसाठी पात्र नव्हती, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईत गोवरचा झपाट्याने होणारा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, तर पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व, मालाड उत्तर, पूर्व उपनगरातील गोवंडी, चेंबूर, कुर्ला, भांडुप या भागांत गोवरचा उद्रेक झाला असून ३७९ भागांत गोवरचा फैलाव झाला आहे. मुंबईत दिवसभरात गोवरचे ८ संशयित रुग्ण आढळले असून संशयित रुग्णांची संख्या ५ हजार ५८० वर पोहोचली आहे.