विरोधी पक्षनेते दानवेंनी आरोप फेटाळले
मुंबई : गेल्यावर्षी राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव समोर येत असल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याची ‘ईडी’ने माहिती मागवली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष राठोडकडे पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या. ज्यात अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
तीस-तीस घोटाळ्यात अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा समोर आल्यानंतर ‘त्या डायरीत माझे नाव नाही, कोणी दुसरा दानवे असेल.’ असा खुलास दानवे यांनी केला आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या डायरीत असलेल्या गुंतवणूकदारांच्या यादीत एका मंत्र्याचा नातेवाईक, एक आमदार, एक डीवायएसपी, एक सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस कर्मचारी, दहा शिक्षक, परभणी जिल्ह्यातील एक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक, कन्नड तालुक्यातील एक नगरसेवक, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सरपंच (एक सरपंच पती), दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शासकीय कंत्राटदार, तीन वाळू व्यावसायिक, एक पोलीस पाटील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, पाटबंधारे विभागाचा एक अधिकारी, एक बँक कर्मचारी आणि चार हॉटेल चालक यांची नावे आहेत.