मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची आज अंमलबजावणी संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. कोरोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी आपण ईडीला पूर्णपणे सहकार्य करु, असे इक्बाल सिंह चहल यांनी आधीच सांगितले होते.
ईडीने तीन दिवसांपूर्वी चहल यांना कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी समन्स पाठवले होते. त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. कोरोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. बेनामी कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट देऊन १०० कोटींचा घोटाळा केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात ईडीने मुंबई महापालिका आयुक्तांना सोमवारी कागदपत्रांसह चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढल्यानंतर कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी माजी बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ८ मे २०२० रोजी आयुक्तपदी इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती केली. आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या नियोजनाबद्दल, निर्णयाबद्दल आणि विशेष प्रयत्नाबद्दल आयुक्त चहल यांचे देश पातळीवर कौतुक झाले. परंतु कोरोना काळात साथ रोग प्रतिबंध कायदा आणि आपात्कालीन व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कुठलीही निविदा प्रक्रिया न राबवता कोरोना कामाची कंत्राट देण्यात आली आणि याच कंत्राटांना आयुक्तांकडून मंजुरी देताना उद्धव ठाकरे आणि त्या वेळच्या सरकारमधील नेत्यांच्या निकटवर्तीयांना कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे. या कंत्राटदारांना वाचवण्याचे काम बीएमसी आयुक्त करत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता या चौकशीतून नेमकं ईडीच्या हाती काय लागतं? या आरोपांमध्ये किती सत्यता आहे? हे ईडीला मिळालेल्या माहिती नंतरच कळेल.