जी – २० परिषदेच्या उद्घाटनानंतर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे : पुण्यात जी – २० देशांची दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी राणे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ही परिषद देशातील विविध शहरांमध्ये होत आहे. ही आंतरराष्ट्रीय संस्था असून त्या परिषदेचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला हे माझे सौभाग्य आहे. भारत एक प्रगतशील देश असून सन २०१४ मध्ये भारत जगात दहाव्या क्रमांकावर होता, तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आपण प्रगती करत आहे. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी यांच्यानंतर आपण पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहोत. आपल्याला विश्वास आहे, पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करतातच. त्यामुळे आपण आर्थिक महासत्ता होऊ हे नक्की, असा ठाम विश्वासही राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
‘आपल्या देशातील ५० टक्के लोकसंख्या ही शहराी भागात राहात असून त्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. यादृष्टीने परिषदे मध्ये चर्चा होणार आहे. पुणे, मुंबई अशी शहरे गुंतवणुकीस आकर्षित करत आहे. भारत प्रगती करत असून त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे’, असेही राणे म्हणाले.बैठीकास उपस्थित राहिल्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.
‘सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यात येण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार सर्व योजना राबविण्यासाठी इच्छुक आहे. प्रत्येक जिल्ह्या नुसार धोरण ठरविण्यात येत आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाल्यास सामान्य नारिकाचाही जी २० परिषदे मधून विकास होईल. अमेरिकाची २० ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे. भारताची सध्या साडेतीन ट्रिलियन असून ती पाच ट्रिलियन करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे’, असेही राणे यांनी सांगितले. पुण्यातील पायाभूत सुविधा पुढील काळात कशा असतील, यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र दिले आहे. जीडीपी वाढण्यासाठी महाराष्ट्र विकसित करण्यासाठी केंद्र प्रयत्न करत आहे. पुण्याला औद्योगिक केंद्र समजतले जाते. आदर्श पायाभूत सुविधा चांगली झाली तर पुणेकरांनाही त्याचा फायदा होईल, असे राणे म्हणाले.
मी नेहमीच गोड बोलतो…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘जी २०’ परिषदे बाबत माहिती दिल्यावर, प्रसार माध्यमांच्या एका प्रतिनिधीने प्रश्न विचारण्या पूर्वी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ अशा शुभेछा देताच, असे नारायण राणे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
‘ते’ कमळ भाजपचे नाही…
जी २० परिषदेच्या लोगोमध्ये कमळ का? असा प्रश्न विचारता नारायण राणे म्हणाले ‘जी -२० परिषद मधील कमळ हे भाजपचे नसून ते भारताचे आहे. शाश्वत विकास म्हणजे कमळ आहे. कमळ म्हणजे भाजप नाही, जो भाजपमध्ये येईल, त्याचा शाश्वत विकास होईल. भाजप शश्वत विकास करतो’.
मंदीचे दुष्परिणाम रोखण्यास केंद्र सक्षम
जून २०२३ नंतर भारतामध्ये आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. पण केंद्र सरकार दुष्परिणाम रोखण्यासाठी सक्षम असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. भारत आर्थिक मंदीला सामोरे जाऊ शकते का? असा प्रश्न विचारल्यानंतर नारायण राणे म्हणाले की, ‘भारतात मंदी आली तर जून नंतर येईल. त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे’. उद्योग वाढवले तर रोजगार वाढतील. रोजगार वाढला तर जीडीपी वाढेल. आपल्याला प्रॉफिट कमवणाऱ्या टेक्नॉलॉजी हव्या आहेत असे राणे म्हणाले.
सरकार बदलले म्हणून उद्योग जात नाहीत…
‘महाराष्ट्राच्या प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सगळे विषय कॅबिनेटमध्ये येतात, आपल्या नेत्यांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखणे चुकीचे आहे. सरकार बदलले म्हणून निर्णय बदलतात असे नाही. एखादा निर्णय पोषक नसेल तर तो बदलला जातो. सरकार बदलले की दृष्टिकोन बदलतो. सरकार बदलले म्हणून उद्योग बाहेर गेले, असे होत नाही. आपल्याकडे गुंतवणूक व्हावी म्हणून उद्योग आणले जातात. मी ४ वर्षे उद्योगमंत्री होतो, जे राज्य जागेवर, टॅक्सवर जास्त सवलती देईल, तिथे उद्योग येतात. काही लोक जागा कमी देतात. महाराष्ट्रात जमीन महाग, पायाभूत सुविधा यावर जमिनीचे दर जास्त आहेत. महाराष्ट्र विकसित राज्य असल्याने येथील खर्च जास्त आहेत. काही उद्योग तेवढ्यापुरते जातात आणि महाराष्ट्रात परत येतात’, असे राणे यांनी स्पष्ट केले.