केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : दुसरे एक पिल्लू फार फार बोलत होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी लागल्यानंतर हे पिल्लू गप्प झाले आहे. आपण काय बोलतो? कशासाठी बोलतो? माणसे तरी ओळखता येतात का? असा हल्लाच केंद्रीय मंत्री राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. भांडुपमधील कोकण महोत्सवास भेट देण्यास आलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हे आता तुरुंगातच जातील, असा दावाही त्यांनी केला.
‘येथे जवळच एक टिनपाट संपादक राहतो. मराठी माणसासाठी कोण काम करतेय हे पाहा. त्यामुळे संजय राऊत तोंड बंद कर. मी देशात काम करतोय. तू खाल्लेल्या मिठाला जाग. माझ्या वाटेला कोणी जात नाही म्हणून संजय राऊत पोलीस सुरक्षेत राहा. नाही तर जेलमध्ये जा’, असा इशाराच राणे यांनी यावेळी दिला. ‘तू कोणाला सांगतो येऊन दाखव. त्या उद्धव ठाकरेंचे शिवसेनेत योगदान किती? आताचे शिवसैनिक हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. शिवसेना मोठी करण्यात माझे योगदान आहे. संपादक आहेस तर चांगले लिही. हा खासदार झाला हे माझे पाप आहे. ‘उद्धव ठाकरेंनी शिवालयात संजय राऊतच्या विरोधात उमेदवार तयार ठेवला होता. पण मला बाळासाहेबांनी याचे नाव सांगितले होते. याचे नाव इलेक्शनच्या यादीत नव्हते. याला खासदार बनवायला खर्च मी केला. आता याची रवानगी जेलमध्येच होईल, एव्हढी हेराफेरी याने केली आहे’, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
श्रीमंताच्या यादीत कोकणी उद्योजक असावा..
कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार मिळावा, असा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने मी सर्व काही पाहतोय. येथील पर्यटनाच्या माध्यमातून कलागुणांना वाव देण्याचे काम सूकर होणार आहे. कारण इथली संस्कृती, खेळ, कलांना संधी, कला – संस्कृती जपणे, ही आता काळाची गरज आहे.सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचा देशाच्या निर्यातीमध्ये आज ५० टक्के वाटा आहे. जीडीपी मध्ये ३० टक्के वाटा आहे. यामध्ये येत्या काही वर्षात अमुलाग्र बदल होणार आहेत. माझ्या खात्याचा उपयोग कोकणवासीयांना व्हावा. कोकणातील माझा तरुण हा उद्योजक झाला पाहिजे. कोकणमहोत्सवाच्या माध्यमातून सुजय धुरत तरुणांना रोजगाराची संधी देत आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या व्यवसायातून तरुणांनी मोठे स्वप्न पहायला शिकावे. श्रीमंतांच्या यादीत कोकणवासीय उद्योजकही असावा हेच माझे स्वप्न आहे, असे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भांडुप येथे सांगितले.