
राहुल गांधीसोबत चालत असताना हृदयविकाराचा झटका
लुधियाना : पंजाबमध्ये सुरू असलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी यांचे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. ते राहुल गांधी यांच्यासमवेत यात्रेत चालत होते. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तात्काळ फगवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली, असे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रा काही काळासाठी थांबवली. ही यात्रा आज लुधियानाच्या लाडोवाल टोल प्लाझा येथून फगवाड्याच्या दिशेने निघाली होती. त्यादरम्यान ही घटना घडली. सकाळी ८.४५ च्या सुमारास खासदार संतोखसिंह यांची प्रकृती खालावली. त्यानंतर राहुल गांधीही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले.
सकाळी ९ वाजेपर्यंत राहुल गांधींनी फिल्लौरमधील भटियानपर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. यात्रा टी-ब्रेकसाठी थांबवण्यात आली. टी-ब्रेकसाठी थांबलेले राहुल गांधी काही मिनिटे बसल्यानंतर ते काही काँग्रेस नेत्यांसह कारमध्ये निघून गेले. सध्या माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, खासदार गुरजित औजला, अमरिंदर सिंग राजा वाडिंग असे काही ज्येष्ठ काँग्रेस नेते त्यांच्याभोवती धावत आहेत.